निवडणूक लढलीस तर ट्रेनसमोर फेकून देईन, भाजपाच्या माजी आमदाराच्या मुलाची बहिणीला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 14:31 IST2023-07-08T14:30:45+5:302023-07-08T14:31:01+5:30
BJP MLA Son Threatens His Sister: या वर्षाच्या अखेरीस देशातील राजस्थानसह पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील इच्छुकांनी कंबर कसली आहे. त्यातून चढाओढ आणि वादविवादही होत आहेत.

निवडणूक लढलीस तर ट्रेनसमोर फेकून देईन, भाजपाच्या माजी आमदाराच्या मुलाची बहिणीला धमकी
या वर्षाच्या अखेरीस देशातील राजस्थानसह पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील इच्छुकांनी कंबर कसली आहे. त्यातून चढाओढ आणि वादविवादही होत आहेत. राजस्थानमधीलभाजपाचे माजी आमदार जयराम जाटव यांच्या मुलाचा एक व्हिडीयो सध्या व्हायरल होत आहे. त्यात तो त्याची बहीण आणि तिच्या मुलग्याला शिविगाळ आणि मारहाण करताना दिसत आहे. तसेच त्याने फोनवरूनही बहिणीला धमकावले होते. बहीण अलवर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याने जयराम जाटव यांचा मुलगा बिजेंद्र हा नाराज आहे, त्यातूनच त्याने हे कृत्य केले.
मीना कुमारी ह्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याती तयारी करत आहेत. मीना कुमारी यांचा मुलगा विशाल याने सांगितले की, जेव्हा आम्ही शुक्रवारी संध्याकाळी निवडणुकीसाठीचे बॅनर लावण्यासाठी गेलो तेव्हा थोड्याच वेळात बिजेंद्र तिथे त्याच्या साथीदारांसह पोहोचला. त्याने आम्हाला शिविगाळ केली. तसेच आम्हाला मारहाणही केली. त्यानंतर त्यांनी तिथे लावलेले बॅनर फाडले.
बिजेंद्र याने मीना कुमारी आणि तिच्या मुलाला बॅनर न लावण्याची धमकी दिली आहे. जर बॅनर लावले तर त्याचे परिणाम वाईट होतील असे त्याने सांगितले. मीना कुमारी यांचा मुलगा विशाल याने याची माहिती मालाखेडा पोलिसांना दिली आहे. मात्र पोलिसांनी आपली कुठलीही मदत केली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
मीना कुमारी यांनी सांगितले की, बिजेंद्र याने माझ्या मुलाला मारहाण केली. तसेच नंतर मला फोनवरून शिविगाळ केली. तसेच ट्रेनसमोर फेकण्याची धमकी दिली. पीडित मीना यांनी सांगितले की, माझं गेल्या २० वर्षांपासून माहेरी येणं-जाणं नाही आहे. आम्ही चार बहिणी आणि दोन भाऊ आहोत. त्यामधील बिजेंद्र हा मला उघड उघड धमक्या देत आहे. यावेळी त्यांनी वडील जयराम जाटव यांच्यावरही बोचरी टीका केली. त्या म्हणाल्या की जो माणूस त्याच्या मुलीचा आणि जावयाचा होऊ शकला नाही, तो सामान्य जनतेचा काय होईल?