पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना धडा शिकवला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या हवाई तळांवर एकापाठोपाठ एक हल्ले करत भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यालाही भारतीय सैन्यदलाने अद्दल घडवली होती. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी जयपूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये एक मोठं विधान केलं आहे. आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं, असे मोहन भागवत म्हणाले.
यावेळी मोहन भागवत यांनी सांगितले की, जगाला धर्म शिकवणं हे भारताचं कर्तव्य आहे. धर्माच्या माध्यमातूनच मानवतेची उन्नती होणं शक्य आहे. विश्वकल्याण हा आमचा प्रमुख धर्म आहे. भारताची भूमिका ही जगात मोठ्या भावासारखी आहे, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, भारत विश्वशांती आणि सौहार्द कायम करण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील आहे. भारत कुणाचाही द्वेष करत नाही मात्र जोपर्यंत तुमच्याजवळ शक्ती नसेल, तोपर्यंत जग प्रेमाची भाषा समजून घेणार नाही. जामुळे जगाच्या कल्याणासाठी शक्ती असणं आवश्यक आहे, तसेच आमची ताकद जगाने पाहिली आहे. शक्ती हे असे माध्यम आहे, ज्याच्या माध्यमातून भारत जगात आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडू शकतो, असे मोहन भागवत यांनी सांगितले.