"जय महाकाल, जय ओम बिर्ला, जय नरेंद्र मोदी. ज्या प्रकारे काँग्रेसच्या २५ खासदारांनी भारताच्या संसदेत घुसून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवीगाळ केली. त्यामुळे भाजपा आणि करणी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे, पुन्हा अशी घटना घडली, राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू", अशी धमकी देणारा व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून हा व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे. 'आज पुन्हा आणखी एक गोडसे तयार केला जात आहे', असे म्हणत काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
करणी सेनेच्या नेत्याकडून ही धमकी दिली गेली आहे. व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, "राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून हे केलं गेलं आहे. राहुल गांधींनी नीट ऐकावे, पुन्हा असे घडले तर घरात घुसून गोळ्या घालून मारू आणि याला प्रशासन जबाबदार असेल."
"२५ खासदारांवर कारवाई झाली पाहिजे. मोदी सरकारचे मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून जे विधान केले गेले आहे, ते ऐकल्यापासून आम्ही खूप रागात आहोत. जर २४ तासांमध्ये त्या २५ खासदारांना अटक झाली नाही, तर प्रत्येकाला आम्ही गोळ्या घालू", अशी धमकी करणी सेनेच्या नेत्याकडून देण्यात आली आहे.
"ओम बिर्लाजी, तुमचा समर्थक आहे, तुम्हाला..."
काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सवाल केला आहे. "हा दहशतवादी स्वतःला करणी सेनेचा असल्याचे सांगत आहे. म्हणत आहे की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि २५ काँग्रेस खासदारांना गोळ्या घालू. ओम बिर्लाजी, हा तुमचा समर्थक आहे. तुम्हाला यावर काही आक्षेप नाही का? आतापर्यंत ना गुन्हा दाखल झालाय, ना अटक झाली आहे. सरकारच्या मौनावर प्रश्न आहे. माध्यमांनाही मौन धरले आहे का?", असेही श्रीनेत यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनीही यावरून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना लक्ष्य केले आहे.
'ही गोडसे फॅक्टरी आहे'
पवन खेरा यांनी या धमकीनंतर बोलताना भाजपा आणि आरएसएसवर टीका केली आहे. "संपूर्ण आरएसएस आणि भाजपा एक गोडसे फॅक्टरी आहे. तथाकथित करणी सेनेकडून राहुल गांधी आणि २५ खासदारांना दिलेली धमकी वेगळी घटना नाहीये. हा नियोजित आणि द्वेषपूर्ण कटाचा भाग आहे", असा गंभीर आरोप खेरा यांनी केला आहे.
"आधी किरेन रिजिजू जाहीरपणे खोटं बोलले आणि देशाची दिशाभूल केली की, काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा अपमान केला. उलट जो व्हिडीओ आहे, तो हा दावा पूर्णपणे खोटा ठरवतो. त्यात अशा पद्धतीचा अपमान केल्याचे दिसत नाही. त्यावेळी तर लोकसभा अध्यक्ष हसत असल्याचे दिसत आहे", असे उत्तर खेरा यांनी रिजिजू यांच्या आरोपांवर दिले आहे.
राहुल गांधींच्या विरोधातील हिंसेची सुनियोजित मोहीम
"भाजपा खासदारांकडून वेगवेगळ्या व्यासपीठांवर एकसारखीच विधाने केली जात आहे की, राहुल गांधी हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका आहेत. ही विरोधकांना बदनाम करण्याचे, राजकीय विरोधकांना विशेषतः राहुल गांधी यांच्याविरोधात हिंसेला वैध ठरवण्याची सुनियोजित मोहीम आहे", असा गंभीर आरोप खेरा यांनी केला आहे.
"कट्टरपंथीय अशाच पद्धतीने काम करतात. ते एक खोटं बोलतात आणि ते वारंवार बोलत राहतात. त्याला राजकारणाचे आवरण लावतात आणि तोपर्यंत प्रसारित करत राहतात, जोपर्यंत त्यांचे समर्थक द्वेष आणि हिंसक होत नाही. तेव्हाही गोडसे बनवला गेला होता आणि आज पुन्हा आणखी एक गोडसे तयार केला जात आहे", अशी टीका खेरा यांनी यावर केली आहे.
Web Summary : Karni Sena leader threatens to shoot Rahul Gandhi after Congress MP's actions in Parliament. Congress alleges a 'Godse factory' is being created, criticizing BJP and RSS. Supriya Shrinate questions Om Birla's silence on the threat.
Web Summary : करणी सेना के नेता ने राहुल गांधी को गोली मारने की धमकी दी। कांग्रेस ने भाजपा और आरएसएस पर 'गोडसे फैक्ट्री' बनाने का आरोप लगाया। सुप्रिया श्रीनेत ने ओम बिरला की चुप्पी पर सवाल उठाया।