"वक्फ विधेयक मंजूर झालं तर...", प्रशांत किशोर यांचं मुस्लीम नेत्यांना मोठं आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:01 IST2025-04-02T16:57:45+5:302025-04-02T17:01:28+5:30

जेडीयूवर निशाणा साधताना प्रशांत किशोर म्हणाले, "जर हे विधेयक संसदेत मंजूर झाले, तर याला भाजपपेक्षाही नितीश कुमारांचा पक्षच अधिक जबाबदार असेल."

If the waqf amendment bill is passed than jdu muslims to leave nitish kumar Prashant Kishor's big appeal to Muslims leaders | "वक्फ विधेयक मंजूर झालं तर...", प्रशांत किशोर यांचं मुस्लीम नेत्यांना मोठं आवाहन!

संग्रहित फोटो...

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू असतानाच बिहारमधील राजकारण तापले आहे. जन सूरज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाला (जेडीयू) या विधेयकाला पाठिंबा न देण्याचे आवाहन केले. तसेच, हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यास, जेडीयूच्या मुस्लीम नेत्यांनी नितीश कुमारांची साथ सोडायला हवी. कारण २०१५ मध्ये नितीश कुमार मुसलमांमुळेच बिहारची निवडणूक जिंकून मुख्यमंत्री झाले होते, असे आवाहनही प्रशांत किशोर यांनी केले आहे. एवढेच नाही तर, मुस्लीम नसते तर नितीश यांचे राजकारण संपले असते, असा दावाही त्यांनी यावेळी केला. ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते.

जेडीयूवर निशाणा साधताना प्रशांत किशोर म्हणाले, "जर हे विधेयक संसदेत मंजूर झाले, तर याला भाजपपेक्षाही नितीश कुमारांचा पक्षच अधिक जबाबदार असेल. नितीश कुमार यांच्या खासदारांनी सभागृहात या विधेयकाच्या बाजूने मतदान करू नये. याच बरोबर, जेडीयूच्या मुस्लीम नेत्यांनीही आपल्या खासदारांना वक्फ विधेयकाविरोधात मतदान करण्याचे आवाहन करायला हवे, असेही ते म्हणाले.

पीके म्हणाले, "आपला जन सूरज पक्ष वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आहे. या विधेयकाचा मुस्लिमांवर थेट परिणाम होतो. सरकारने मुस्लीम समाजाला विश्वासात न घेता वक्फ कायदा बनवणे चुकीचे ठरेल. संविधानात अल्पसंख्याकांना दिलेल्या अधिकारांमध्ये, त्या समाजाच्या सहमतीशिवाय, कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणे योग्य नाही."

२०१५ मध्ये मुस्लीम समाजाने आपल्याला मुख्यमंत्री बनवण्यासाठी महाआघाडीला मतदान केले होते, अशी आठवणही प्रशांत किशोर यांनी यावेळी नितीश कुमार यांना करून दिली. एवढेच नाही तर, आज, वक्फ विधेयकाला पाठिंबा देऊन, नितीश आणि जेडीयू मुस्लीम समुदायाला दिलेले वचन मोडत आहेत, असेही प्रशांत किशोर म्हणाले.

Web Title: If the waqf amendment bill is passed than jdu muslims to leave nitish kumar Prashant Kishor's big appeal to Muslims leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.