शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 19:39 IST2025-12-15T19:38:55+5:302025-12-15T19:39:43+5:30
IAS Aditya Srivastava : आदित्य श्रीवास्तवने आपल्या यूपीएससीच्या तयारीसाठी तब्बल ४० लाखांचं पॅकेज सोडलं.

शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
लखनौच्या आदित्य श्रीवास्तवने आपल्या यूपीएससीच्या तयारीसाठी तब्बल ४० लाखांचं पॅकेज सोडलं. नोकरी सोडली तेव्हा आदित्यला यशाची खात्री नव्हती, पण वडिलांचं स्वप्न आणि स्वतःवर विश्वास होता. त्यामुळे आदित्यची यशोगाथा आज लाखो यूपीएससी उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. लखनौमधील आयआयएम रोडवरील एल्डिको सिटीमध्ये राहणारा आदित्य लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. शालेय शिक्षण सीएमएस स्कूल, अलीगंज येथे झालं.
दहावीच्या परीक्षेत आदित्यने ९७.८ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर बारावीत ९७.५ क्के गुण मिळवले. शालेय शिक्षणानंतर त्याने इंजिनियरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. प्रवेशासाठी जेईई मेन्स प्रवेश परीक्षा दिली, जी देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. जेईई मेन्समध्ये चांगली रँक मिळाल्यानंतर जेईई एडव्हान्स्डमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर आयआयटी कानपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये बीटेक आणि एमटेक केलं.
आयआयटी कानपूरमधून बाहेर पडल्यानंतर आदित्यला एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. सुमारे दीड वर्ष बंगळूरु येथील एका एमएनसी कंपनीत काम केलं. पण नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं होतं. त्याच्या वडिलांना वाटत होतं की मुलाने नागरी सेवेत जावं आणि आयएएस-आयपीएस बनावं. वडील अजय श्रीवास्तव हे सेंट्रल ऑडिट डिपार्टमेंटमध्ये एएओ पदावर कार्यरत आहेत, तर त्यांची धाकटी बहीणही नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे.
वडिलांची इच्छा पाहून आदित्यने दीड वर्षानंतर नागरी सेवेत जाण्याचा निश्चय केला. यूपीएससी तयारीसाठी केवळ एक महिना आधी ४० लाखांचं पॅकेज असलेली नोकरी सोडली. हा त्याचा पहिला प्रयत्न होता. यूपीएससी नागरी सेवा प्रिलिम्स २०२१ मध्ये अपयश आलं. तरीही हार मानली नाही. त्यावेळी कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळाला. आदित्यने दुप्पट मेहनत केली. एनसीईआरटीची पुस्तके आणि यूट्युबच्या मदतीने यूपीएससीची तयारी केली. अपयशानंतर सलग यूपीएससी परीक्षा क्रॅक करून आपली क्षमता सिद्ध केली.
२०२२ मध्ये आदित्यला यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत २३६ वा रँक मिळाला आणि तो आयपीएस (IPS) अधिकारी झाला. तरीही त्याने आशा सोडली नाही आणि २०२३ च्या यूपीएससी परीक्षेत टॉप करून आयएएस (IAS) अधिकारी झाला. आपल्या यशाचं श्रेय त्याने सातत्याने केलेली कठोर मेहनत, वेळेचं व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टिकोनाला दिलं आहे.