'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:48 IST2025-11-25T17:48:08+5:302025-11-25T17:48:16+5:30
भाजप आणि निवडणूक आयोगावर ममता बॅनर्जींची तीव्र टीका;

'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी SIR प्रक्रियेवरुन निवडणूक आयोग आणि केंद्रातील भाजपव सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, एसआयआर पूर्ण झाल्यानंतर आणि मतदार याद्यांचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांना भाजप आणि आयोगाने निर्माण केलेल्या आपत्तीचे खरी चित्र स्पष्ट दिसेल. त्यांनी नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीचे निकालही एसआयआरशी जोडत तीव्र शंका उपस्थित केली.
...तर भाजपला देशभरात
एसआयआरविरोधी सभेत भाषण करताना ममता बॅनर्जी यांनी थेट भाजपला आव्हान दिले. त्यांनी म्हटले की, बिहारचा निकाल एसआयआरचा परिणाम आहे. विरोधक भाजपची चाल ओळखू शकले नाही. जर एसआयआर 2-3 वर्षांनी केला असता, तर आम्ही त्याला सहकार्य केले असते, पण आता हे राजकीय हेतूने केले जात आहे. त्यांनी दावा केला की, बंगालमध्ये त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न झाल्यास त्या देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकतील.
VIDEO | North 24 Paraganas: "If BJP tries to strike me in Bengal, I will shake its foundation across India", says CM Mamata Banerjee (@MamataOfficial) at anti-SIR rally in Bongaon.
— Press Trust of India (@PTI_News) November 25, 2025
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/vvHuE2l9lm
निवडणूक आयोग निष्पक्ष राहिला नाही
ममता यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, आयोग आता निष्पक्ष संस्था राहिली नाही. ते भाजपचे कमीशन बनले आहे. भाजप माझ्याशी राजकीय लढत देऊ शकत नाही, म्हणून इतर मार्ग वापरते. भाजपशासित राज्यांमध्ये एसआयआर होत असेल, तर केंद्र मान्य करते का की तिथेही घुसखोर आहेत? बांग्लादेशी हटवणे उद्देश असेल, तर यूपी-एमपीमध्ये एसआयआर का नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
घुसखोरीबाबत केंद्रावर थेट निशाणा
रोहिंग्या किंवा इतर घुसखोर भारतात येत असतील, तर मग सीमांची जबाबदारी कोणाची? बॉर्डर मॅनेजमेंट केंद्र सरकार करते. CISF विमानतळ सांभाळते. कस्टम्स केंद्राच्या अखत्यारीत आहे. नेपाळ सीमा कोण सांभाळतो? सीमांची जबाबदारी राज्यावर ढकलून बंगालला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंगाल ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात बीजेपी येत्या निवडणुकीत गुजरातमध्ये पराभूत होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.