‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 06:45 IST2025-09-28T06:44:02+5:302025-09-28T06:45:01+5:30
भारतीय बॅडमिंटनपटूंना दुखापतीतून सावरून पुनरागमन करताना झुंजावे लागते. यावर सायना म्हणाली की, केवळ भारतीयच नाही, तर अनेक विदेशी खेळाडूंनाही पुनरागमन करताना झुंजावे लागते.

‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
रोहित नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘गुडघादुखापतीमुळे मला दीर्घकाळ खेळापासून दूर राहावे लागले होते. बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन केले, तरी पुन्हा उच्च स्तरावर खेळणे आव्हानात्मक ठरेल. शिवाय, सध्या मी खेळणेही सोडले आहे,’ असे ऑलिम्पिक पदक मिळवणारी भारताची पहिली बॅडमिंटनपटू ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने ‘लोकमत’ला सांगितले. सायनाच्या उपस्थितीत येथे शनिवारी सीएक्सओ पिकलबॉल स्पर्धा रंगली. यावेळी तिने प्रस्तुत प्रतिनिधीशी संवाद साधला.
निवृत्तीनंतरचा खेळ म्हणून पिकलबॉलकडे पाहू नका. हा एक उच्च स्तराचा खेळ आहे. यामध्ये मोठी स्पर्धा आहे. मी अनेक खेळाडूंना यामध्ये दुखापतग्रस्त होतानाही पाहिले आहे. या खेळामध्ये कारकीर्द घडविण्याची मोठी संधी आहे. शरीर साथ देत असेल, तर नक्कीच खेळाडूंनी आपापल्या खेळातून निवृत्त झाल्यानंतर हा खेळ खेळावा.
- सायना नेहवाल
सायना सध्या खेळापासून दूर असली, तरी तिने अद्याप निवृत्तीबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
पुनरागमनासाठी इच्छाशक्ती, सकारात्मकता महत्त्वाची
भारतीय बॅडमिंटनपटूंना दुखापतीतून सावरून पुनरागमन करताना झुंजावे लागते. यावर सायना म्हणाली की, केवळ भारतीयच नाही, तर अनेक विदेशी खेळाडूंनाही पुनरागमन करताना झुंजावे लागते. स्पेनच्या कॅरोलिन मरिनला एकच दुखापत तीनवेळा झाली. तीदेखील झुंजत आहे. इच्छाशक्तीवर बरेच काही अवलंबून आहे. त्यामुळे सकारात्मक मानसिकता महत्त्वाची आहे. पुनरागमनानंतर आपण पूर्वीप्रमाणेच खेळू शकू की नाही, असा प्रश्न खेळाडूंना असतो. शिवाय पुन्हा दुखापत होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे केवळ इच्छाशक्ती असावी.
चिराग-सात्विक आणतील ऑलिम्पिक पदक
चिराग शेट्टी-सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारताच्या स्टार जोडीबाबत सायना म्हणाली की, चिराग-सात्विक खूप चांगली कामगिरी करत आहेत. भविष्यात त्यांच्याकडून नक्कीच ऑलिम्पिक पदक मिळू शकेल. पुढच्या वर्षी आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी करून ते पुढे विश्वविजेतेपदही पटकावतील. ही जोडी इतकी मजबूत आहे की, ते कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात. पण, प्रत्यक्षात कोर्टवर कसा खेळ होतो, यावर सर्व अवलंबून आहे.