"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:59 IST2025-12-24T17:51:47+5:302025-12-24T17:59:05+5:30
हीच आमच्या पदाची शपथ आहे आणि त्यासाठीच आम्ही येथे बसलो आहोत. भजन करायला थोडीच बसलो आहोत. भजन करायचे असेल तर आमच्याकडे मठ पुरेसे आहेत," अशा आक्रमक शब्दांत त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
उत्तर प्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. "जेव्हा कोणी 'हेकडी' दाखवतो, तेव्हा ती ठीक करणए सरकारचे काम आहे. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्..., हीच आमच्या पदाची शपथ आहे आणि त्यासाठीच आम्ही येथे बसलो आहोत. भजन करायला थोडीच बसलो आहोत. भजन करायचे असेल तर आमच्याकडे मठ पुरेसे आहेत," अशा आक्रमक शब्दांत त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
शिक्षण सेवा निवड आयोगाच्या अध्यक्षपदी माजी डीजीपी प्रशांत कुमार यांची नियुक्ती केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ज्याप्रमाणे गुंड-माफियांची कंबर तोडली, त्याचप्रमाणे आता 'कॉपी माफिया'चीही कंबर तोडण्यासाठी एका कडक पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. "कॉपी माफियांची सवय तुम्ही बिघडवली होती, ती सुधारण्याचे काम आमचे सरकार पारदर्शक भरती प्रक्रियेद्वारे करत आहे," असा टोलाही त्यांनी समाजवादी पक्षाला लगावला.
अवैध बांधकामांवर बुलडोझर चालणारच जमीन बळकावणाऱ्या माफियांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कडक इशारा दिला. सरकारी किंवा लोकांच्या जमिनीवर अवैध कब्जा करून मॉल उभारणाऱ्या किंवा वसुलीचे अड्डे चालवणाऱ्यांवर बुलडोझर चालणारच, त्याला कोणीही रोखू शकत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी त्यांनी शिवपाल सिंह यादव यांच्यावरही निशाणा साधला. समाजाला सर्वात आधी सुरक्षा आणि कायद्याचे राज्य हवे असते आणि आपल्या सरकारने कोणत्याही योजनेत भेदभाव न करता सर्वांना सुरक्षा पुरवली आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हणाले.