'मला या कारमध्ये प्रवास करायला आवडत नाही, माझी कार मारुती 800...', योगींच्या मंत्र्याने मनमोहन सिंग यांचा किस्सा सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 09:04 IST2024-12-27T08:42:24+5:302024-12-27T09:04:54+5:30
उत्तर प्रदेशचे मंत्री असीम अरुण यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत आठवणी सांगितल्या आहेत.

'मला या कारमध्ये प्रवास करायला आवडत नाही, माझी कार मारुती 800...', योगींच्या मंत्र्याने मनमोहन सिंग यांचा किस्सा सांगितला
देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवीन उंची मिळवून देणारे माजी पंतप्रधान तसेच ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे वयाच्या ९२व्या वर्षी गुरुवारी रात्री कालवश झाले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक अर्थऋषी गमावला. देशभरातून मोठ्या नेत्यांनी शोक व्यक्त केला. तर अनेक नेत्यांनी सिंग यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मंत्री असीम अरुण यांनीही आठवणी शेअर केल्या आहेत. असीम अरुण आधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे अंगरक्षक होते, त्याकाळातील त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. या आठवणीतून डॉ. मनमोहन सिंग यांचा साधेपणा समोर येतो.
अर्थऋषी कालवश; आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
डॉ. मनमोहन सिंग २००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांचे मुख्य अंगरक्षक म्हणून असीम अरुण हे तैनात होते. ते मुख्य अंगरक्षक असल्या कारणामुळे त्यांचा आणि सिंग यांचा रोजच संपर्क असायचा. यावेळी घडलेल्या आठवणी असीम अरुण यांनी फेसबुकवर लिहिल्या आहेत. मंत्री असीम अरुण यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असीम अरुण म्हणाले की, मी २००४ पासून जवळपास तीन वर्षे त्यांचा बॉडीगार्ड होतो. एसपीजीमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सर्वात आतील सुरक्षा घेरा असतो, क्लोज प्रोटेक्शन टीम (सीपीटी), ज्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली होती. एआयजी सीपीटी तो व्यक्ती असतो, जो पंतप्रधानांपासून कधीही दूर राहू शकत नाही. जर फक्त एकच बॉडीगार्ड पंतप्रधानांसोबत राहू शकतो, तर तो हा व्यक्ती असेल. अशा प्रकारे, त्यांच्यासोबत सावलीसारखे राहण्याची जबाबदारी माझी होती.
डॉ.साहेबांची स्वतःची एकच कार होती - मारुती 800, जी पीएम हाऊसच्या आत चमचमणाऱ्या काळ्या बीएमडब्ल्यूच्या मागे उभी असायची. मनमोहन सिंग साहेब वारंवार मला म्हणायचे, "असीम, मला या गाडीत (बीएमडब्ल्यू) बसायला आवडत नाही, माझी गाडी ही आहे (मारुती)." मी त्यांना समजावायचो, "सर, ही गाडी तुमच्या वैभवासाठी नाही, तर तिचे सुरक्षा फीचर्स पाहून एसपीजीने ती घेतली आहे." पण जेव्हा कारकेड मारुतीसमोरून जायचा, तेव्हा ते नेहमी तिला प्रेमाने पाहायचे, जणू ते आपले ठाम निश्चय पुन्हा पुन्हा सांगत असायचे, "मी मध्यमवर्गीय माणूस आहे आणि सामान्य लोकांची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे. कोट्यवधींची गाडी पंतप्रधानांची आहे, पण माझी गाडी ही मारुती आहे."
डॉ. मनमोहन सिंग २६ डिसेंबर रोजी अचानक घरी बेशुद्ध पडले, त्यांनी रात्री ८.०६ वाजता दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले. यानंतर एम्सने एक निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात सिंग यांच्या मृत्यूची घोषणा केली.