‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:57 IST2025-12-25T16:56:53+5:302025-12-25T16:57:20+5:30
Uttar Pradesh Crime News: ‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, असं पँटवर लिहून प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या तरुणाने जीवन संपवल्याने खळबळड उडाली आहे. सौरभ असं जीवन संपवणाऱ्या तरुणाचं नाव असून, त्याच्यावर प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप होता.

‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, असं पँटवर लिहून प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याने खळबळड उडाली आहे. सौरभ असं जीवन संपवणाऱ्या तरुणाचं नाव असून, त्याच्यावर प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप होता. उत्तर प्रदेशमधील आंबेडकरनगर येथील रहिवासी असलेल्या सौरभ याने आझमगडमधील अतरौलिया येथे झाडाला गळफास लावून जीवन संपवले.
अल्पवयीन प्रेयसी स्नेहा हिची हत्या केल्याचा आरोप सौरभवर करण्यात आला होता. सुमारे १७ दिवस बेपत्ता असलेल्या स्नेहा हिचा मृतदेह २१ डिसेंबर रोजी घराजवळ सापडला होता. दरम्यान, हत्येचा आरोप झालेल्या सौरभ याने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी ‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’ असं आपल्या पँटच्या खिशावर लिहून ठेवलं. त्यानंतर गळफास घेऊन जीवन संपवलं. प्रेयसी स्नेहा हिची हत्या केल्याचा संशय असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान, २४ डिसेंबर रोजी त्याचा मृतदेह आझमगडमधील नंदना गावामध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला.
आंबेडकरनगर जिल्ह्यातील राजेसुल्तानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पदुमपूर येथील रहिवासी असलेल्या सौरभ हा या तरुणीची छेड काढल्याच्या प्रकरणात आधीही तुरुंगात जाऊन आला होता. दरम्यान, तो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर २ डिसेंबर रोजी सदर तरुणी बेपत्ता झाली होती. तसेच जवळपास १७ दिवसांनंतर तिचा मृतदेह सापडला होता. तसेच तिची हत्या केल्याचा आरोप सौरभवर झाला होता. मात्र सौरभ याने जीवन संपवण्यापूर्वी आपण निर्दोष असल्याचा दावा केल्याने या प्रकरणातील गुंतागुंद अधिकच वाढली आहे.
या प्रकरणात राजेसुल्तानपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्नेहा ही २ डिसेंबर रोजी बेपत्ता झाली होती. तर ४ डिसेंबर रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मात्र १५ दिवसांनंतरही पोलीस तिचा शोध घेऊ शकले नाहीत. शेवटी या तरुणीचा मृतदेह घरापासून १०० मीटर अंतरावर सापडला होता. त्यामुळे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यापासून पोलीस एवढे दिवस काय करत होते. असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तीनेच जीवन संपवल्याने खऱ्या आरोपीला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
दरम्यान, मृत सौरभ याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी सौरभ याचा सातत्याने छळ केला. त्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप सौरभच्या कुटुंबीयांनी केला आहे.