'मी नेहरूवादी, राजीववादी; पण राहुलवादी नाही', मणिशंकर अय्यर यांचे पक्षनेतृत्वावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:58 IST2026-02-16T16:58:00+5:302026-02-16T16:58:44+5:30

काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर!

'I am a Nehruvian, a Rajivvian; but not a Rahulvian', Mani Shankar Aiyar criticizes Rahul Gandhi | 'मी नेहरूवादी, राजीववादी; पण राहुलवादी नाही', मणिशंकर अय्यर यांचे पक्षनेतृत्वावर टीकास्त्र

'मी नेहरूवादी, राजीववादी; पण राहुलवादी नाही', मणिशंकर अय्यर यांचे पक्षनेतृत्वावर टीकास्त्र

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. अय्यर यांनी सोमवारी(दि.१६) केलेल्या वक्तव्यांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे त्यांनी केरळमध्ये पिनराई विजयन पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे भाकीत केले, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि पक्षातील नेतृत्वावरही उघडपणे टीका केली.

मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी; पण राहुलवादी नाही

मीडियाशी बोलताना अय्यर म्हणाले, मी गांधीवादी आहे, नेहरूवादी आहे, राजीववादी आहे; पण राहुलवादी नाही. मिस्टर राहुल गांधी हेच विसरले आहेत की, मी काँग्रेसचा सदस्य आहे.

केसी वेणुगोपाल, पवन खेरा यांच्यावरही टीका

अय्यर यांनी पक्षातील नेमणुकांवरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आज केसी वेणुगोपाल यांच्याकडे तीच जबाबदारी आहे, जी कधी सरदार पटेल यांच्याकडे होती. यावरून काँग्रेसची स्थिती काय आहे, हे लक्षात येते. याशिवाय त्यांनी काँग्रेसचे मीडिया व प्रचार विभाग प्रमुख पवन खेरा यांच्यावरही जहरी टीका केली. पवन खेरा यांना अधिकृत प्रवक्ता बनवण्यात आले आहे. यावरूनच काँग्रेसची अवस्था समजते. ते प्रवक्ता नाहीत, तर पोपटासारखे आहेत. जयराम रमेश जे सांगतात, तेच ते बोलतात. ते फक्त बाहुली आहेत. जर पवन खेरा मला काँग्रेसमधून काढणार असतील, तर मी स्वतःच बाहेर पडेन आणि त्यांना मागून लाथ मारीन, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले. 

पक्षांतर्गत कलहावर भाष्य

अय्यर यांनी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांवरही टीका केली. ज्या पक्षात नेते एकमेकांशी भांडतात, एकमेकांचे गळे कापायला तयार असतात, अशा पक्षाला जनता मत का देईल? ही परिस्थिती लोकांना माहिती नाही का? एक काळ असा होता की काँग्रेसमध्ये निर्णय सर्वमान्य असायचे. नेहरू पंतप्रधान झाले, तेव्हा सर्वांनी ते मान्य केले. जर सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला नसता, तर कदाचित ते राष्ट्रपती झाले असते.

केरळ निवडणुकीवर अय्यरांचे भाकीत

केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अय्यर यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, एक काँग्रेस नेता म्हणून मला UDF जिंकावी असे वाटते. पण गांधीवादी म्हणून सांगतो की, पिनराई विजयन पुन्हा सत्तेत येऊ शकतात. केरळमधील लोक त्यांच्या कामाला पसंती देत आहेत. मला खोटे बोलायचे नाही, असे अय्यर म्हणाले.

काँग्रेसने स्वतःला या विधानापासून दूर ठेवले 

काँग्रेसचे मीडिया व प्रचार विभागाचे प्रमुख पवन खेरा म्हणाले, मणिशंकर अय्यर यांचा गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी कोणताही अधिकृत संबंध राहिलेला नाही. ते जे काही बोलतात किंवा लिहितात, ते पूर्णपणे त्यांचे वैयक्तिक मत आहे. पवन खेरा यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश म्हणाले, याबाबत कोणताही संभ्रम असू नये. केरळचे लोक अधिक जबाबदार आणि प्रतिसादक्षम प्रशासनासाठी UDF ला पुन्हा सत्तेत आणतील. तसेच LDF आणि BJP हे गुप्तपणे एकमेकांचे सहयोगी असल्याचेही जनतेला माहिती आहे.
 

Web Title : अय्यर ने कांग्रेस नेतृत्व की आलोचना की: 'मैं नेहरूवादी, राहुलवादी नहीं'.

Web Summary : मणि शंकर अय्यर ने राहुल गांधी और पार्टी नेतृत्व की आलोचना करते हुए नेहरूवादी आदर्शों के प्रति निष्ठा व्यक्त की। उन्होंने केरल में विजयन के फिर से चुनाव की भविष्यवाणी की, जिससे विवाद पैदा हो गया।

Web Title : Aiyar criticizes Congress leadership: 'I'm Nehruvian, not a Rahul follower'.

Web Summary : Mani Shankar Aiyar criticized Rahul Gandhi and party leadership, expressing loyalty to Nehruvian ideals. He also predicted Vijayan's re-election in Kerala, sparking controversy.