Hyderabad University: दिल्ली युनिव्हर्सिटीनंतर आता हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी (HCU) च्या निवडणुकीतही आरएसएसशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत एबीव्हीपीने डाव्यांची विद्यार्थी संघटना आणि काँग्रेसशी संलग्न असलेल्या एनएसयुआय (NSUI) ला मागे टाकले.
एबीव्हीपी पॅनलचा दबदबा
ABVP पॅनलमधून शिवा पालेपु अध्यक्ष, देवेंद्र उपाध्यक्ष, श्रुती महासचिव, सौरभ शुक्ला संयुक्त सचिव, ज्वाला प्रसाद क्रीडा सचिव आणि वीनस सांस्कृतिक सचिव म्हणून निवडून आले. इतकेच नव्हे तर इतर लहान पदांवरही एबीव्हीपीने विजय मिळवून बहुमत मिळवले.
सहा वर्षांनंतर डावे-NSUIचा पराभव
हा विजय अतिशय खास मानला जातोय, कारण गेल्या सहा वर्षांपासून विद्यापीठात डावे, दलित संघटना आणि NSUI चा दबदबा होता. एबीव्हीपीचा विजय विद्यार्थ्यांच्या बदलत्या कलाचा आणि राष्ट्रवादी विचारसरणीकडे झुकण्याचा पुरावा मानला जात आहे.
NSUI NOTA पेक्षाही कमी मते
काँग्रेसशी संलग्न NSUI चा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. एवढेच नव्हे तर त्यांच्या उमेदवारांना NOTA (None of the Above) पेक्षाही कमी मते मिळाली. राज्यात काँग्रेसची सत्ता असतानाही विद्यापीठ पातळीवर NSUI चे अपयश चर्चेचा विषय ठरला आहे.
राष्ट्रवाद विरुद्ध वैचारिक राजकारण
ABVP चे प्रवक्ते अंतरिक्ष यांनी म्हटले की, हा विजय म्हणजे विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादावर विश्वास आणि विभाजनकारी राजकारणाला नकार आहे. सामाजिक विज्ञान विभागासारख्या वामपंथी प्रभाव असलेल्या विभागांमध्येही एबीव्हीपीचा विजय हा विद्यार्थ्यांच्या विचारसरणीत झालेल्या बदलाचे द्योतक आहे. एबीव्हीपीने या विजयाला HCU च्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण म्हटले.
दिल्ली युनिव्हर्सिटीमध्येही ABVP चा ऐतिहासिक विजय
दोन दिवसांपूर्वीच दिल्ली विद्यापीठ (DUSU) विद्यार्थी संघाच्या २०२५ च्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने दणदणीत विजय मिळवला. DUSU केंद्रीय पॅनेलमध्ये ABVP ने चार पैकी तीन जागा जिंकल्या, तर राष्ट्रीय विद्यार्थी संघ भारतीय (NSUI) ला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे आर्यन मान यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.