नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 08:42 IST2026-01-02T08:41:57+5:302026-01-02T08:42:44+5:30
एक विवाहित तरुण आपल्या प्रेयसीसोबत फिरायला आला होता, मात्र चार दिवसांपासून त्याचा माग काढत असलेल्या पत्नीने त्याला तिथे गाठले. त्यानंतर भररस्त्यात जो काही राडा झाला..

नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी गजबजलेल्या नैनीतालच्या निसर्गरम्य परिसरामध्ये सोमवारी एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. गाझियाबादचा एक विवाहित तरुण आपल्या प्रेयसीसोबत फिरायला आला होता, मात्र चार दिवसांपासून त्याचा माग काढत असलेल्या पत्नीने त्याला तिथे गाठले. त्यानंतर भररस्त्यात जो काही राडा झाला, तो पाहून पर्यटकांच्याही काळजाचा ठोका चुकला. संतापलेल्या पत्नीने केवळ गोंधळच घातला नाही, तर पतीच्या कारच्या काचाही फोडून आपला संताप व्यक्त केला.
बोनेटवर बसली तरी काढली कार!
गाझियाबादचा हा तरुण आपल्या ऑफिसमधील सहकाऱ्यासोबत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी नैनीतालला पोहोचला होता. दोघेही कारमधून फिरत असताना अचानक त्याची पत्नी तिथे पोहोचली . पत्नीला पाहताच पतीने कार पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेली पत्नी थेट कारच्या बोनेटवर जाऊन बसली. धक्कादायक बाब म्हणजे, बोनेटवर पत्नी असतानाही पतीने कार न थांबवता तशीच काही अंतरापर्यंत ओढत नेली. अखेर स्थानिकांनी मध्यस्थी करत ही कार थांबवली.
११ वर्षांचा संसार आणि 'वो'ची एन्ट्री
कार थांबताच पत्नीचा संयम सुटला. तिने कारवर जोरदार प्रहार करत काचा फोडल्या. हा गोंधळ पाहून कारमध्ये असलेली गर्लफ्रेंड संधी मिळताच तिथून पसार झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या पती-पत्नीला पोलीस ठाण्यात नेले. तिथे पत्नीने आपल्या संसाराची व्यथा मांडली. तिने सांगितले की, त्यांचे लग्न ११ वर्षांपूर्वी झाले असून त्यांना एक मुलगीही आहे. मात्र, पतीचे त्याच्या ऑफिसमधील एका मुलीशी प्रेमसंबंध असून तो अनेकदा तिला फसवून बाहेर फिरत असतो.
घटस्फोटाचा खटला आणि धमक्या
पीडित पत्नीने पोलिसांना सांगितले की, गेल्या चार दिवसांपासून नवरा घरातून गायब होता आणि तिचा फोनही उचलत नव्हता. पतीने तिला याआधीही अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली असून त्यांच्यात घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. "मला फक्त त्या मुलीला समोर आणून जाब विचारायचा आहे," अशी मागणी तिने पोलिसांकडे केली.
ही घटना घडली तेव्हा नैनीतालमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने पर्यटकांची मोठी गर्दी होती. या संपूर्ण ड्रामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी सध्या दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले असून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.