पतीने पोलीस कॉन्स्टेबल पत्नीसह आई आणि मुलांची केली हत्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 15:27 IST2024-08-13T15:17:17+5:302024-08-13T15:27:21+5:30
Bihar Crime News: बिहारमधील भागलपूर येथील पोलीस लाइनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कौटुंबिक वादातून एका तरुणाने पोलीस कॉन्स्टेबल पत्नीसह आई आणि दोन मुलांची हत्या केली. त्यानंतर या तरुणाने स्वत:ही जीवन संपवल्याचं समोर आलं आहे.

पतीने पोलीस कॉन्स्टेबल पत्नीसह आई आणि मुलांची केली हत्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
बिहारमधील भागलपूर येथील पोलीस लाइनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कौटुंबिक वादातून एका तरुणाने पोलीस कॉन्स्टेबल पत्नीसह आई आणि दोन मुलांची हत्या केली. त्यानंतर या तरुणाने स्वत:ही जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं.
मृत महिला कॉन्स्टेबल नीतू कुमारी ही बक्सर येथील रहिवासी होती. तर पंकज कुमार हा आरा जिल्ह्यातील रहिवासी होता. दोघांचाही प्रेमविवाह झालेला होता. दरम्यानस नीतू हिची दोन वर्षांपूर्वी भागलपूर येथे बदली झाली होती. तेव्हापासून हे कुटुंब येथील सरकारी पोलीस क्वार्टरमध्ये राहत होते. दरम्यान, नीतूचा पती हा बेरोजगार असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता, या पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. दरम्यान हा वाद इतका विकोपाला गेला की अखेरीस त्याची परिणती या भयंकर हत्याकांडामध्ये झाली. घटनास्थळावरून एक चिठ्ठीही सापडली आहे. मात्र पोलीस सध्या सगळ्या शक्यता विचारात घेऊन पुढील तपास करत आहेत.
या प्रकरणी तपासासाठी एफएसएलच्या पथकालाही घटनास्थळी बोलावण्यात आलं आहे. तर हत्याकांडामधील मृतांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.