गर्भवती पत्नीच्या खूनप्रकरणी पती अखेर पोलिसांच्या ताब्यात, अपघात भासवून खून केल्याचे उघड; कर्नाटकातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 18:54 IST2025-09-11T18:53:35+5:302025-09-11T18:54:22+5:30
गर्भवतीच्या निधनाने हळहळ

गर्भवती पत्नीच्या खूनप्रकरणी पती अखेर पोलिसांच्या ताब्यात, अपघात भासवून खून केल्याचे उघड; कर्नाटकातील घटना
शिरगुप्पी : उगार बुद्रुक (ता. कागवाड, कर्नाटक राज्य) येथे गर्भवती पत्नीच्या अंगावर मोटार घालून अपघात भासवून खून करणारा पती अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
याबाबत अधिक माहिती अशी : कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक येथील वकील असणाऱ्या प्रदीप अण्णासाहेब किरणगी (वय ३०) गल्लीतीलच चैत्राली अण्णासाहेब माळी (वय २२) हिच्याशी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर पती व सासूकडून तिचा जाच करण्यात येत होता. यामध्ये ती गर्भवती असल्याने ७ सप्टेंबर रोजी पती प्रदीप यांनी दवाखान्याला दाखविण्यासाठी शिरगुप्पीकडे दुचाकी (केए ७१ एच ८५३२) घेऊन आला होता.
परत उगार बुद्रुककडे जाताना रस्त्यामध्ये लघुशंकेला जाण्याचे निमित्त करून त्याने दुचाकी थांबवली. याचवेळी रस्त्याकडेला थांबलेल्या चैत्रालीला मोटार कार (केए २२ एमडी ४२३८)ने धडक दिली. यामध्ये तिच्या डोक्याला मार लागला. त्याच गाडीमधून तिला मिरजच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र रात्री सव्वाअकराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला.
या सर्व घटनेचा चैत्रालीचे वडील अण्णासाहेब माळी यांना संशय आल्याने त्यांनी कागवाड पोलिसांत तक्रार नोंदविली. चौकशी केली असता खुनाच्या घटनेला वाचा फुटली. संशयिताला तत्काळ अटक करण्यात आली. सोबत माेटारचालकालाही अटक केली आहे.
गर्भवतीच्या निधनाने हळहळ
तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेली चैताली किरणगी ही सात महिन्यांची गर्भवती होती. तिच्या खुनाच्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळाला मंगळवारी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख रामनगौडा बसरगी, डीवायएसपी प्रशांत मुनोळी, सीपीआय संतोष हळूर, कागवाडचे उपनिरीक्षक राघवेंद्र खोत यांनी भेट देऊन माहिती घेतली.