बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 15:36 IST2025-10-23T15:32:34+5:302025-10-23T15:36:48+5:30
दिवाळीच्या आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात गुजरातच्या सुरत जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि थरारक बातमी समोर आली आहे.

बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
दिवाळीच्या आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात गुजरातच्या सुरत जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि थरारक बातमी समोर आली आहे. ओळपाड तालुक्यातील कुदसद गावात एका क्षणात एका कुटुंबाचा आनंद हिरावला गेला. चिराग रेसिडेन्सीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका अचानक घडला की, बघता बघता आनंदाचे वातावरण दुःखात बदलले.
काय घडले नेमके?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण बाल्कनीमध्ये उभा होता. नेमका त्याचवेळी त्याचा पाय अचानक घसरला आणि तोल जाऊन तो इमारतीच्या ग्रिलमध्ये अडकला. पतीला ग्रिलवर लटकलेला पाहून पत्नीच्या काळजाचा ठोका चुकला. क्षणाचाही विलंब न लावता ती धावत बाल्कनीत पोहोचली आणि तिने पतीला वाचवण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले.
हातातील हात सुटला अन्...
पत्नीने आपल्या पतीचा हात घट्ट पकडला होता, पण नियतीने काहीतरी वेगळाच डाव साधला होता. पतीचा भार जास्त असल्यामुळे आणि हात निसटल्यामुळे, पत्नी जास्त वेळ त्याला आधार देऊ शकली नाही आणि क्षणात तिच्या हातातून पतीचा हात निसटला!
तो तरुण सरळ खाली कोसळला. कोसळण्याचा मोठा आवाज होताच आजूबाजूचे लोक धावले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. खाली पडल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. कुटुंबातील सदस्यांच्या किंकाळ्यांनी सारा परिसर हेलावला.
ओरिसाचा रहिवासी
या घटनेचा थरार ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला, त्यांचेही मन हेलावले. ही संपूर्ण घटना काही क्षणांत घडली आणि कुणालाही काही करण्याची संधी मिळाली नाही. मृत तरुण मूळचा ओडिशा राज्यातील रहिवासी असून, तो कामाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वीच सुरतमध्ये आला होता, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सणासुदीच्या काळात झालेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात गमचे वातावरण असून, स्थानिक लोक शोकग्रस्त पत्नीला धीर देत कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त करत आहेत.