नवा ट्विस्ट... पाकिस्तानात गेलेल्या अंजू आणि नसरुल्लाविरुद्ध पती अरविंदनं केला एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 13:48 IST2023-08-05T13:48:36+5:302023-08-05T13:48:58+5:30
पती आणि दोन मुलांना सोडून पाकिस्तानात गेलेल्या अलवरच्या अंजूच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे.

नवा ट्विस्ट... पाकिस्तानात गेलेल्या अंजू आणि नसरुल्लाविरुद्ध पती अरविंदनं केला एफआयआर दाखल
फेसबुकवर झालेल्या प्रेमापोटी पती आणि दोन मुलांना सोडून पाकिस्तानात गेलेल्या अलवरच्या अंजूच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. अंजूचा पती अरविंद यानं पत्नी अंजू आणि तिचा पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लाह यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
अलवरच्या भिवाडी येथील रहिवासी असलेल्या अंजूनं पाकिस्तानात जाऊन तिचा प्रियकर नसरुल्ला याच्याशी लग्न केल्याप्रकरणी अंजूचा पती अरविंद यानं शुक्रवारी रात्री उशिरा भिवडीतील फूलबाग पोलीस ठाण्यात अंजू आणि नसरुल्लाविरुद्ध फिर्याद दिली. अरविंदच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत आयपीसी कलम ३६६, ४९४, ५००, ५०६ आणि आयटी अॅक्ट ४७/६६ अन्वये गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी भिवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अंजू पोहोचली पाकिस्तानात
कुटुंबीयांशी खोटं बोलून अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली. अंजू विवाहित असून तिला दोन मुलं आहेत. तिनं इस्लाम धर्म स्वीकारला असून आता फातिमा असं नवीन नाव असल्याचा दावा पाकिस्तानी मीडियानं केलाय. तसंच ती ज्या फेसबुक फ्रेंडला भेटायला आली होती त्याच्याशी निकाह केल्याचंही म्हटलं जातंय. अंजू आणि नसरुल्लाह हे सध्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अपर दीर भागात आहेत.
एका महिन्याचा व्हिसा
अंजू २० जुलै रोजी एका महिन्याचा व्हिसा घेऊन पाकिस्तानला गेली, या व्हिसाची अंतिम मुदत २० ऑगस्ट आहे. अंजू २० ऑगस्टपर्यंत पाकिस्तानातून भारतात येते की नाही, हे येणारा काळच सांगेल. मात्र आता अंजूच्या पती आणि मुलांनी अंजूसोबत कोणतेही संबंध ठेवण्यास नकार दिला आहे.