लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 06:01 IST2025-05-14T06:01:49+5:302025-05-14T06:01:49+5:30

लष्कराला लाभली मोलाची साथ; पाकिस्तानचा प्रत्येक कोपरा निगराणीखाली, हल्ल्यापूर्वी पाकने घेतली होती छायाचित्रे

how indian army finds the terrorist camps to fulfill operation sindoor and know these weapons have forced pakistan to beg for mercy | लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक

लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर 'अंतर्गत पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी शिबिरांना उद्ध्वस्त करण्यात लष्कराला देशाच्या अत्याधुनिक उपग्रहांकडून मोलाची साथ लाभली आहे. दहशतवादी तळ नेमके कुठे आहेत, हे माहीत करून घेण्यासाठी लोकेशनचे मॅपिंग करणे अत्यंत महत्त्वाचे होते. हे जिकिरीचे काम 'इस्रो'च्या 'सिंथेटिक अपर्चर रडार'ने सज्ज रिसेंट श्रृंखलेतील उपग्रहांनी अत्यंत अचूकपणे केले.

'इस्रो'च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरमध्ये हायसिस व 'जीसॅट-७ ए' या उपग्रहांच्या माहितीचा उपयोग करून घेण्यात आला.

पाकिस्तानचा प्रत्येक कोपरा निगराणीखाली

सिंथेटिक अपर्चर रडार उपग्रह पृथ्वीची हाय रिझॉल्यूशन छायाचित्रे काढण्यात सक्षम आहे. रिसेंट श्रृंखलेतील उपग्रहांनी ऑपरेशनल झाल्यानंतर इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टिमला सक्रिय केले. या प्रणालीमुळे भारतात कुठेही बसून पाकिस्तानातील कुठेही बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला बघणे शक्य होते.

रडार इमेजिंग उपग्रहांची गरज मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रकर्षाने भासली. त्यामुळेच रिसॅट श्रृंखलेतील उपग्रहांची योजना तयार करण्यात आली.

हल्ल्यापूर्वी पाकने घेतली होती छायाचित्रे

पहलगाम हल्ल्यापूर्वी या भागातील सॅटेलाइट छायाचित्रे घेण्यात आली होती. अमेरिकी अवकाश तंत्रज्ञान कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीजला पहलगाम व आसपासच्या भागात सॅटेलाइट छायाचित्रे देण्यासंबंधी ऑर्डर मिळाल्याचे चौकशीत समोर आले. या पार्श्वभूमीवर मॅक्सार कंपनीने पाकच्या 'बीएसआय' कंपनीशी असलेला भागीदारी करार रद्द केला. २ ते २२ फेब्रुवारीदरम्यान मॅक्सार कंपनीला १२ ऑर्डर मिळाल्या. ही संख्या सामान्य संख्येपेक्षा दुप्पट होती. या छायाचित्रांसाठी गेल्या जूनपासूनच ऑर्डर मिळू लागल्या होत्या.

या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक

आकाश क्षेपणास्त्र प्रणाली

स्वदेशी बनावटीच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यांना तोंड देताना आपली ताकद दाखवून दिली. ते ४.५ किमी ते २५ किमी अंतरापर्यंत मारा करू शकते. ते एकाच वेळी ६४ टार्गेटला ट्रॅक करून १२ टार्गेटवर निशाणा साधू साधू शकते. अर्मेनियाने ते विकत घेतले आहे. फिलीपिन्स, इजिप्त, व्हिएतनाम आणि ब्राझील यांनी आकाश क्षेपणास्त्रात रस दाखविला आहे.

नागास्त्र-१ सुसाइड ड्रोन

भारतीय बनावटीच्या नागास्त्र १ लोईटरिंग म्यूनिशनचा पहिल्यांदाच युद्धात वापर करण्यात आला. हे एक आत्मघातकी ड्रोन आहे जे आपले टार्गेट उडवून देण्यासाठी स्वतःचा स्फोट करते. ते टार्गेटवरून फिरत राहते आणि हल्ला करण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहत असते.

अँटी-ड्रोन डी-४ सिस्टिम

पाकच्या ड्रोनला या स्वदेशी अँटी-ड्रोन सिस्टमने पराभूत केले. हे ड्रोन शोधण्यास, ट्रॅक करण्यास आणि निष्क्रिय करण्यास सक्षम आहे.

स्कायस्ट्रायकर ड्रोन

स्कायस्ट्रायकर हे लांब पल्ल्याचा अचूक मारा करण्यासाठी स्वस्त ड्रोन आहे. हे हवाई अग्निशमन मोहिमेसाठी योग्य आहे. ते मानवरहित विमान प्रणालीसारखे उडते

ब्रह्मोस क्षेपणास्त्र

भारताने पाकच्या हवाई तळांवर अचूक हल्ला केला तेव्हा ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूड क्षेपणास्त्राचा वापर केला गेला. ब्राह्मोस हल्ल्यांमुळेच पाकने भारतासमोर गुडघे टेकले, दयेची भीक मागितली आणि शस्त्रसंधीची विनंती केली. ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक देश ब्रह्मोस क्षेपणास्त्रात रस दाखवू शकतात.
 

Web Title: how indian army finds the terrorist camps to fulfill operation sindoor and know these weapons have forced pakistan to beg for mercy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.