जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:57 IST2025-11-10T14:57:17+5:302025-11-10T14:57:56+5:30
डॉ. अहमद मोहिउद्दीन सय्यद यांच्याकडून पोलिसांनी तीन पिस्तूल, ३० जिवंत काडतुसे आणि चार लिटर एरंडेल तेल जप्त केले.

जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
अहमदाबाद - गुजरात एटीएसने भारतात मोठ्या हल्ल्याचं षडयंत्र रचणाऱ्या दहशतवाद्यांकडून रिसिन जप्त केले आहे. हे तेच विष आहे ज्याचा वापर जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. रिसिन हे खूप धोकादायक विष मानले जाते. जगात या विषावर कुठले औषध नाही. केवळ डोनाल्ड ट्रम्प नाही तर माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनाही रिसिन विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. हे विष दोनदा लिफाफ्यातून पाठवले गेले होते. गुजरात एटीएसने अटक केलेल्या ३ संशयित दहशतवाद्यांपैकी एक MBBS डॉक्टर आहे तर दुसरा शिलाईचे काम करतो, तिसरा विद्यार्थी आहे.
डॉक्टरवर ATS ला कसा आला संशय?
गुजरात एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अहमद सैय्यद याने चीनमधून वैद्यकीय शिक्षण घेतले होते. तो अनेक भाषा बोलायचा. तो आयएसकेपीचा ऑनलाइन प्रचार करायचा. सैय्यद आधी एक रेस्टॉरंट व्यवसाय करत होता, ज्याठिकाणी तो एरंडीच्या बिया ठेवायचा. ज्याचा वापर नंतर रिसिन बनवण्यासाठी केला जायचा. हे खतरनाक विष तो कुठे वापरणार होता याचा तपास एटीएस अधिकाऱ्यांनी केला. त्यात कदाचित एखाद्या धार्मिक स्थळी प्रसादात हे मिसळण्याचा कट होता असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हैदराबादच्या या डॉक्टरला वैद्यकीय खूप ज्ञान आहे. चीनमधून शिक्षण घेतलेल्या या डॉक्टरने याआधी या विषाचा प्रयोग केल्याची शंका एटीएसला आहे.
ATS च्या हाती काय काय लागलं?
डॉ. अहमद मोहिउद्दीन सय्यद यांच्याकडून पोलिसांनी तीन पिस्तूल, ३० जिवंत काडतुसे आणि चार लिटर एरंडेल तेल जप्त केले. डॉ. अहमद सय्यद याच्यासोबत अटक केलेले इतर दोन संशयित त्यांना शस्त्रे वाहतूक करण्यास मदत करत होते असा एटीएसला संशय आहे. काही आरएसएस कार्यालये त्यांचे लक्ष्य असल्याचेही उघड झाले आहे. गुजरात एटीएसच्या मते तिघांच्या चौकशीतून अधिक धागेदोरे उघड होतील आणि नवीन तथ्ये समोर येतील अशी अपेक्षा आहे. गुजरात एटीएसची अनेक पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासात संशयितांचे आयएसकेपीशी संबंध उघड झाले आहेत.
रिसिन किती धोकादायक?
रिसिन हे एरंडेल वनस्पतीच्या (रिसिनस कम्युनिस) बियांमध्ये आढळणारे एक प्रथिन आहे. ही वनस्पती जगभरात प्रामुख्याने तेल काढण्यासाठी लागवड केली जाते. एरंडेल तेल औषधे, साबण आणि यंत्रसामग्रीमध्ये वापरले जाते. मात्र या बियांमध्ये रिसिन नावाचे विष असते, जे इतके शक्तिशाली आहे की ते जैविक शस्त्र मानले जाते. अमेरिका आणि रशिया सारख्या देशांनी एकेकाळी ते शस्त्र म्हणून वापरण्याचा विचार केला होता.