Maharashtra Politics : लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे? विरोधकांच्या प्रश्नाला अजितदादा गटाच्या प्रवक्त्याने दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:30 IST2025-02-07T16:29:47+5:302025-02-07T16:30:54+5:30
Supriya Sule vs Ajit Pawar : दिल्ली निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचाही केला आरोप

Maharashtra Politics : लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे? विरोधकांच्या प्रश्नाला अजितदादा गटाच्या प्रवक्त्याने दिले उत्तर
Supriya Sule vs Ajit Pawar : राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र अजूनही विरोधकांकडून या निकालावर संशय व्यक्त केला जात आहे. आज काँग्रेस खासदार राहुल गांधी, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात, ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा पुन्हा एकदा आरोप केला. "आम्हाला निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी द्यावी. नाव, पत्ता आणि फोटोग्राफसह द्यावी," अशा आशयाची मागणी करणारी संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या आरोपांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने प्रत्युत्तर दिले. "दिल्ली निवडणूकीत काँग्रेसला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानेच पुन्हा एकदा शिळया कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी टीका केली.
लोकसभेनंतर मतदार यादी सदोष नव्हती का?
"लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ३१ खासदार निवडून आल्यानंतर कधीही मतदारयादी सदोष आहे अशाप्रकारची पत्रकार परिषद घेतली नव्हती. २०१९ च्या विधानसभेनंतर २०२४ च्या लोकसभेपर्यंत ३२ लाखच मतदार मतदारयादीत वाढले. आणि लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत ३९ लाख मतदार वाढल्याचा आरोप केलात. पण लोकसभेनंतर मतदार नोंदणीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आणि ज्यांना-ज्यांना विधानसभा लढायची आहे, तो प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला व नवीन मतदारांची नोंदणी केली. त्यात काँग्रेसही मागे नव्हती. वाढलेले मतदान हे लोकसभेनंतर विधानसभेला वाढत असते याची जाणीव ठेवा," असे आनंद परांजपे यांनी सुनावले.
लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे?
लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त आहेत असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, "कोविडमुळे २०२० मध्ये जनगणना झाली नाही. त्यामुळे मतदार आकडेवारीमध्ये तफावत असू शकते. लोकसभेला जी मतदान केंद्रे होती, त्यापेक्षा जास्त २५-३० मतदानकेंद्रे निवडणूक आयोगाने अधिक वाढवली होती. महाराष्ट्रातील शहरी भागात मतदान केंद्रे वाढवण्यात आली होती. त्यामुळे मतदारांची यादी देखील वाढली हे स्पष्ट होते," असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेनंतर मिळालेल्या यशानंतर मतदार यादीबद्दल किंवा ईव्हीएमबद्दल कधीही काँग्रेसने किंवा त्यांच्या घटक पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही याबद्दलही आनंद परांजपे यांनी काँग्रेसला फटकारले.