रुग्णालयाचा निर्दयीपणा! नवजात अर्भकाचा मृतदेह प्लास्टिकच्या डब्यात टाकून नातेवाईकांकडे सोपवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:53 IST2026-03-08T13:51:49+5:302026-03-08T13:53:34+5:30
Jharkhand Shocking News: झारखंडच्या चक्रधरपूर उपविभागीय रुग्णालयातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली.

रुग्णालयाचा निर्दयीपणा! नवजात अर्भकाचा मृतदेह प्लास्टिकच्या डब्यात टाकून नातेवाईकांकडे सोपवला
झारखंडच्या चक्रधरपूर उपविभागीय रुग्णालयातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली. रुग्णालयातील प्रशासकीय निष्काळजीपणामुळे एका पित्याला आपल्या मृत नवजात बाळाचा मृतदेह चक्क प्लास्टिकच्या डब्यात घालून घरी न्यावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
करिकेला पोलीस स्टेशन हद्दीतील बांगरसाई गावातील रहिवासी रामकृष्ण हेम्ब्रम यांनी आपली पत्नी रीता यांना तीन दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी चक्रधरपूर रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी रीता यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला, मात्र दुर्दैवाने जन्मानंतर काही वेळातच बाळाचा मृत्यू झाला.
बाळाच्या मृत्यूने कुटुंब आधीच दुख:त असताना रुग्णालय प्रशासनाने संवेदनहीनतेचा कळस गाठला. मृतदेह सन्मानाने नेण्यासाठी साधी रुग्णवाहिका किंवा मदतीचा हात देण्याऐवजी, रुग्णालयाने मृतदेह एका प्लास्टिकच्या डब्यात भरून कुटुंबाच्या स्वाधीन केला. रामकृष्ण यांनी मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाकडे रुग्णवाहिकेची वारंवार मागणी केली. मात्र, प्रशासनाने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. हताश झालेल्या पित्याने आपल्या काळजाच्या तुकड्याचा मृतदेह प्लास्टिकच्या डब्यातूनच गावी नेला.
ही घटना कोल्हाण विभागाचे मुख्यालय असलेल्या चाईबासा येथील आहे. विशेष म्हणजे हा परिसर खनिज संपत्तीने समृद्ध असून सरकारला अब्जावधींचे उत्पन्न मिळवून देतो. मात्र, येथील गरीब जनतेसाठी असलेल्या आरोग्य सुविधांची अवस्था एखाद्या गंजलेल्या सायकलीसारखी झाली आहे, अशी टीका स्थानिक नागरिकांनी केली आहे.