तामिळनाडूच्या चिदंबरममध्ये रेल्वे आणि स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी आहेत. अपघातानंतर स्कूल बसची परिस्थीती पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
सेम्मानगुप्पम भागात शाळेची बस मुलांना घेऊन जात होती. रेल्वे ट्रॅक पार करत असताना ट्रेनची या बसला टक्कर बसली. या अपघातात स्कूल बसच्या चिंधड्या उडाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी भरलेली ही स्कूल बस उडून रेल्वे ट्रॅकच्या बाजुला असलेल्या झुडुपात पडली. या स्कूल बसचा व्हिडिओ पाहिला असता अपघाताच्या तीव्रतेची कल्पना येते.
रेल्वे येत असल्याचे स्कूल बसच्या चालकाला समजले नसल्याचा अंदाज बांधला जात आहे. यामुळे वेगाने येत असलेल्या ट्रेनला बसची धडक बसली. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. आतापर्यंत दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. इतर विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीने कुडड्लोर सरकारी हॉस्पिटलमद्ये नेण्यात आले आहे.
अनेकदा ट्रेन जाईपर्यंत थांबावे लागते म्हणून वाहन चालक ट्रेनच्या समोरूनच वाहन काढण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात मोठे अपघात होतात. स्कूल बस चालकाने ट्रेन येताना पाहिली होती की नाही हे आता तपासानंतरच समोर येणार आहे. परंतू, सध्या घटनास्थळी शेकडो लोक जमले असून रेल्वे खात्याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत आहेत.