ऑनर किलिंग - डोळ्यांसमोर मुलीची हत्या होत असताना आई-वडील नुसतं पाहत राहिले, दोघेही अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 11:19 IST2017-10-27T10:41:36+5:302017-10-27T11:19:02+5:30
आपल्याच मुलीच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. हे ऑनर किलिंग असल्याचा पोलिसांना संशय आहे.

ऑनर किलिंग - डोळ्यांसमोर मुलीची हत्या होत असताना आई-वडील नुसतं पाहत राहिले, दोघेही अटकेत
चंदिगड - आपल्याच मुलीच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. हे ऑनर किलिंग असल्याचा पोलिसांना संशय आहे. मुलीच्या हत्येच्या कटात सामीर असल्याचा आरोप दोघांवर ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झज्जर येथील सुरहेती गावात राहणारं हे दांपत्य आपल्या मुलीचं शेजारील गावातील मुलासोबत अफेअर सुरु असल्याने नाराज होतं.
एफआयआरनुसार, पीडित तरुणीचा मामा जसवंत (40) याने आई-वडिलांच्या डोळ्यासमोर गळा दाबून हत्या केली. पीडित तरुणीचे वडिल वेदपाल (48) एक वरिष्ठ लष्कर अधिकारी होते. मात्र वेळेआधीच सेवानिवृत्ती घेत ते दिल्ली पोलिसांत दाखल झाले होते. वेदपाल आणि त्यांची पत्नी मोनी देवीला अटक करण्यात आली असून, मामा जसवंत अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हत्या करण्यात आल्यानंतर ही आत्महत्या आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती झज्जर पोलिसांनी दिली आहे. मात्र ग्रामस्थांनी हे ऑनर किलिंग असल्याचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांना कारवाई करण्यास मदत मिळाली.
एफआयआरमध्ये लिहिण्यात आलं आहे की, पीडित तरुणी वंदनाचे शेजारच्या गावातील तरुण राहुलसोबत संबंध होतं. कुटुंबाला जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्याच्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला. पण यानंतरही वंदना आणि राहुलच्या भेटीगाठी सुरु होत्या. 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री वंदनाच्या मामा आणि आई-वडिलांनी पुन्हा एकदा तिला धमकी देत राहुलला भेटू नको असं सांगितलं. पण जेव्हा वंदनाने नकार दिला तेव्हा त्यांचा संताप झाला. रात्री दीड वाजता वंदनाच्या मामाने गळा दाबून तिची हत्या केली. हत्या होत होती तेव्हा वंदनाचे आई-वडिल शांत उभं राहून नुसतं पाहत होते.
तपास अधिकारी उप पोलीस निरीक्षक सतबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडिलांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. चौकशीदरम्यान दोघेही आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करत होते. आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा आपण पुर्ण केली, पण ती आमच्या हाताबाहेर निघून गेली होती. आई-वडिल आणि मामा जसवंतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.