Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 07:31 IST2025-11-22T07:29:38+5:302025-11-22T07:31:59+5:30
Labour Law Reform India: केंद्र सरकारने शुक्रवारी ऐतिहासिक निर्णय घेत चार कामगार संहिता तत्काळ प्रभावाने लागू केल्या.

Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: केंद्र सरकारने शुक्रवारी ऐतिहासिक निर्णय घेत चार कामगार संहिता तत्काळ प्रभावाने लागू केल्या. त्यासोबत २९ जुने कामगार कायदे इतिहास जमा झाले असून कामगार क्षेत्रात नवे पर्व सुरू झाले आहे. नव्या कामगार कायद्यान्वये सर्व क्षेत्रात किमान वेतन कायदेशीररित्या लागू होईल तसेच वेळेवर वेतन देणे बंधनकारक असेल, ओव्हरटाइमसाठी दुप्पट वेतन मिळेल आणि महिलांना रात्रपाळीत कामाची मुभा व समान वेतन मिळेल. याचा लाभ देशभरातील ४० कोटी कामगारांना होणार असून त्यांना सामाजिक सुरक्षेची गॅरंटी यामुळे मिळणार आहे.
नव्या कायद्यात गिग वर्क, प्लॅटफॉर्म वर्क आणि ॲग्रिगेटर यांची प्रथमच स्पष्ट व्याख्या केली असून कामगार सुरक्षेसाठी ‘व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य मंडळ’ , तर तक्रार निवारणासाठी जलद व्यवस्था आणि २ सदस्यीय न्यायाधिकरण स्थापन होणार आहे. यासंबंधीची अधिकृत अधिसूचना कामगार मंत्रालयाच्या वतीने जारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यम मंच ‘एक्स’वर काही पोस्ट्स जारी करून याची माहिती दिली. त्यानंतर कामगारमंत्री मनसुख मांडविया यांनीही पत्रकार परिषद घेऊन नव्या कायद्यांची माहिती दिली. ते म्हणाले, नवीन कामगार संहिता लागू झाल्यामुळे कामगार कायदे एकसमान झाले आहेत. यामुळे देशातील ४० कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची गॅरंटी मिळणार आहे.
"सरकारने अधिसूचित केलेल्या चार कामगार संहिता या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वांत व्यापक व प्रगत कामगार सुधारणा आहेत. उद्योगांना गती मिळेल आणि रोजगारनिर्मिती वाढेल", असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
४० वर्षांवरील कामगारांना मोफत आरोग्य तपासणी धोकादायक उद्योगात १ कर्मचारी असला तरी ईएसआयसी बंधनकारक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे रजा, वैद्यकीय सुविधा, इ. सर्व फायदे देणे बंधनकारक
आता एक वर्षात लागू होणार ग्रॅज्युएटी
पत्रकार, डिजिटल मीडिया कर्मचारी, डबिंग कलाकार, स्टंटमन यांचाही समावेश करण्यात आला.
या आहेत नव्या कामगार संहिता
- वेतन संहिता, २०१९ I औद्योगिक संबंध संहिता, २०२० I सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० I व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामकाज स्थिती संहिता, २०२०
नवीन कामगार कायद्यांमुळे कोणत्या कामगारांना काय फायदा होणार?
- धोकादायक उद्योगांतील कामगारांना आरोग्य सुरक्षा
- गीग आणि प्लॅटफॉर्म कामगारांचाही (डिलिव्हरी बॉय, कॅब चालक) सामाजिक सुरक्षा योजनेत समावेश
- कर्मचाऱ्याला नेमणुकीचे पत्र देणे बंधनकारक