हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटस; ऐनवेळी काँग्रेस आमदारांची पलटी, BJP उमेदवाराला केले मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 22:02 IST2024-02-27T22:01:04+5:302024-02-27T22:02:23+5:30
हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान पार पडले. यात भाजपचे हर्ष महाजन विजयी झाले आहेत.

हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटस; ऐनवेळी काँग्रेस आमदारांची पलटी, BJP उमेदवाराला केले मतदान
Himachal Rajya Sabha Election Result 2024 : हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान पार पडले. यात भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले आहेत. सत्ताधारी काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. आता भाजपा राज्य सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे.
हिमाचल प्रदेशातकाँग्रेसच्या 40 जागा आहेत, इतर तीन अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा पक्षाने केला होता. ते तीन आमदार काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र, मतदानावेळी त्यांनीही क्रॉस व्होटिंग केले. काँग्रेसच्या 6 आमदारांसह एकूण 9-10 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, विजयाच्या घोषणेनंतर भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. विजयाबद्दल हर्ष महाजन यांनी भाजप नेतृत्वाचे आभार मानले.
नेमकं काय झालं?
हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण 68 आमदारांनी मतदान केले. भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना 34-34 मते मिळाली. क्रॉस व्होटिंगमुळे हिमाचलमध्ये अडचण निर्माण झाली, यानंतर चिठ्ठी काढून निर्णय घेण्यात आला. यामध्ये भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले तर काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांसह एकूण 9 आमदारांनी क्रॉस व्होटिंग करुन भाजपला मतदान केले.
काँग्रेसच्या या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले
हिमाचलमध्ये क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदारांमध्ये सुजानपूरचे राजेंद्र राणा, धर्मशालाचे सुधीर शर्मा, कुतलाहारचे देवेंद्र भुट्टो, बडसरचे आयडी लखनपाल, लाहौल-स्पितीचे रवी ठाकूर आणि गग्रेटचे चैतन्य शर्मा यांचा समावेश आहे. मतदानापूर्वी हे सर्वजण सकाळी एकाच वाहनातून विधानसभेत पोहोचले आणि मतदानानंतर अचानक अज्ञातस्थळी रवाना झाले.
तीन अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा
हिमाचलचे तीन अपक्ष आमदार यापूर्वी काँग्रेसला पाठिंबा देणार होते, पण त्यांनी भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांच्या बाजूने मतदान केले. या अपक्ष आमदारांमध्ये हमीरपूरचे आशिष शर्मा, देहराचे होशियार सिंह आणि नालागढचे केएल ठाकूर यांचा समावेश आहे.