मालकाचा करुण अंत पाहिला पण साथ सोडली नाही; थरथरत श्वानाने ४ दिवस मृतदेहाजवळ दिला पहारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:49 IST2026-01-27T13:49:09+5:302026-01-27T13:49:34+5:30

हिमालचमध्ये बर्फाच्या वादळात मालकाचा मृत्यू झाल्यानंतर श्वान त्याच्या शेजारी ४ दिवस पहारा देत होते.

Himachal Pradesh dog stood guard for 4 days near its owner body | मालकाचा करुण अंत पाहिला पण साथ सोडली नाही; थरथरत श्वानाने ४ दिवस मृतदेहाजवळ दिला पहारा

मालकाचा करुण अंत पाहिला पण साथ सोडली नाही; थरथरत श्वानाने ४ दिवस मृतदेहाजवळ दिला पहारा

Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एका पाळीव श्वानाने त्याच्या मालकासाठी जे केलं ते पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत. उणे तापमान, हाडं गोठवणारी थंडी आणि सतत होणारी बर्फवृष्टी अशा परिस्थितीत आपल्या मालकाचा मृत्यू झाल्यानंतरही, हा मूक जीव सलग चार दिवस अन्ना पाण्याविना मालकाच्या मृतदेहाचे रक्षण करत तिथेच थांबला होता. प्रतिकूल हवामान आणि हाडं गोठवणाऱ्या थंडीत दोन तरुणांचा मृत्यू झाला, पण त्यांचा पाळीव कुत्रा सलग चार दिवस  मालकाच्या मृतदेहाचे रक्षण होता.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षांचा विकसित राणा आणि त्याचा १३ वर्षांचा मावस भाऊ पीयूष हे २३ जानेवारी रोजी भरमाणी माता मंदिरात दर्शनासाठी गेले होते. विकसितला ट्रेकिंग आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रचंड छंद होता. पीयूषचा लाडका कुत्राही त्यांच्यासोबत या मोहिमेवर होता. दर्शन घेऊन हे दोघेही डोंगररांगांवर व्हिडिओ शूट करण्यासाठी वर गेले, मात्र अचानक निसर्गाचा कोप झाला.

बर्फाळ वादळात हरवला रस्ता
डोंगरमाथ्यावर असताना अचानक जोरदार बर्फवृष्टी आणि वादळ सुरू झाले. काही वेळातच रस्ते बर्फाखाली गाडले गेले आणि हे दोन्ही मुले तिथेच अडकली. विकसितने घरी शेवटचा फोन केला तेव्हा त्याच्या मोबाईलची बॅटरी संपत आली होती. त्यानंतर दोघांचेही फोन बंद झाले. उणे तापमानामुळे आणि थंडीने गारठल्यामुळे या दोन्ही निष्पाप मुलांचा डोंगरावरच दुर्दैवी मृत्यू झाला.

अन्नापाण्याविना ७२ तासांहून अधिक काळ पहारा

प्रशासनाने या मुलांच्या शोधासाठी ड्रोन आणि भारतीय हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरची मदत घेतली. सोमवारी जेव्हा बचाव पथक कुकरू कांडा येथील डोंगरावर पोहोचले, तेव्हा त्यांना पीयूषचा मृतदेह एका झाडाजवळ सापडला. मात्र, तिथले दृश्य पाहून बचाव पथकही थक्क झाले. पीयूषचा कुत्रा त्या थंडीत थरथरत असूनही त्याच्या मृतदेहाजवळ बसला होता. बचाव पथक जवळ येताच, या इमानी श्वानाने त्यांच्यावर भुंकायला सुरुवात केली. गेल्या चार दिवसांपासून काहीही न खाता-पिता तो बर्फात आपल्या मालकाच्या संरक्षणासाठी उभा होता.

बचाव पथकाने बऱ्याच प्रयत्नांती कुत्र्याला शांत केले. त्यानंतर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पीयूषचा मृतदेह आणि या श्वानाला भरमौर येथे आणण्यात आले. विकसितचा मृतदेह जवळच एका नाल्यात सापडला. स्थानिक आमदार जनक राज यांनी या घटनेची पुष्टी केली असून, या श्वानाला सुरक्षितपणे वाचवून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title : बर्फ में चार दिन तक वफादार कुत्ते ने मालिक के शव की रक्षा की

Web Summary : हिमाचल प्रदेश में, एक कुत्ता अपने मालिक की ट्रेकिंग के दौरान मृत्यु होने के बाद, ठंड में चार दिनों तक उसके शव के पास रहा। कुत्ते ने बचाव दल के आने तक शव की रक्षा की। वफादार कुत्ते को सुरक्षित रूप से परिवार को लौटा दिया गया।

Web Title : Loyal Dog Guards Owner's Body for Four Days in Snow

Web Summary : In Himachal Pradesh, a dog stayed by his deceased owner for four days in freezing conditions after the owner died during a trek. The dog guarded the body until rescuers arrived. The loyal dog was then safely returned to the family.