हेमंत सोरेन यांच्या शपथविधीत विरोधक करणार शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:33 IST2019-12-29T01:28:45+5:302019-12-29T06:33:02+5:30
अनेक नेत्यांची हजेरी; सहा राज्यांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

हेमंत सोरेन यांच्या शपथविधीत विरोधक करणार शक्तिप्रदर्शन
रांची : झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेस यांच्या आघाडीचे सरकार रविवारी स्थापन होणार असून, त्या शपथविधीला भाजपविरोधी पक्षांचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. झामुमोचे नेते हेमंत सोरेन उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
दोनच दिवसांनी नववर्ष सुरू होत असल्याने नवे वर्ष भाजपविरोधी पक्षांचे असा त्यांचा नारा असू शकेल, असे दिसते. सोरेन यांच्याबरोबर किती जण शपथ घेणार हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसचे किती व कोण मंत्री असतील, हेही जाहीर झालेले नाही. तसेच राष्ट्रीय जनता दलही आघाडीत सहभागी होते व त्यांचा एक जण विजयी झाला आहे. त्याच्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव आमदाराच्या गळ्यातही मंत्रीपदाची माळ पडणार का, हे नक्की नाही.
शपथविधीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्यप्रदेशचे कमलनाथ, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हजर राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी तसेच अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, हरीश रावत यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मात्र आपण शपथविधी समारंभाला येऊ शकणार नाही, असे आधीच सोरेन यांना सांगितले आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व बसपाच्या सर्वेसर्वा मायावती याही हजर राहण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव व जितनराम मांझी हे नेतेही हेमंत सोरेन यांच्या शपथविधीला हजर राहतील, असे समजते. (वृत्तसंस्था)
पुष्पगुच्छ नकोत, पुस्तके द्या
आपणास शुभेच्छा देताना कृपया पुष्पगुच्छ आणू नका, त्याऐवजी पुस्तके द्या, त्याचा उपयोग मला आणि सर्वांनाच होईल, असे आवाहन हेमंत सोरेन यांनी पक्ष कार्यकर्ते, नेते तसेच राज्यातील जनतेला केले आहे. त्यांचे हे आवाहन लोकांना खूपच आवडले आहे.