अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 07:27 IST2025-10-06T07:27:20+5:302025-10-06T07:27:39+5:30
मुसळधार पावसामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे शेकडो पर्यटक अडकले आहेत.

अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले
दार्जिलिंग : पश्चिम बंगालमधील मिरिक आणि दार्जिलिंगच्या डोंगररांगांमध्ये रविवारी झालेल्या अविरत मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने अनेक मुलांसह किमान २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
मुसळधार पावसामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे शेकडो पर्यटक अडकले आहेत. भूस्खलनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मिरिक भागात किमान ११ जणांचा मृत्यू झाला आहे. सात जखमींना या भागातून वाचवण्यात आले आहे. दार्जिलिंगमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे आणि पोलिस, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य
सुरू आहे.
मुख्यमंत्री फिल्डवर
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, हे २०१५ नंतरचे सर्वात भीषण संकट आहे. मी मुख्य सचिवांसह पाच बाधित जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांसोबत व्हर्च्युअल बैठका घेतल्या. मी सकाळी ०६:०० वाजेपासून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. फक्त १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला, ज्यामुळे किमान सात ठिकाणी गंभीर पूर, भूस्खलन झाले.
शेकडो पर्यटक अडकले
दुर्गापूजेसाठी दार्जिलिंगच्या डोंगररांगांमध्ये आलेले शेकडो पर्यटक अडकले आहेत. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे दार्जिलिंगच्या टेकड्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.
चीनवर मॅटमो वादळाचा प्रभाव वाढतोय
बँकॉक : चीनच्या दिशेने झेपावणाऱ्या मॅटमो वादळाचा प्रभाव वाढत आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी चीन सरकारने ग्वांगडोंग व हैनान प्रांतातील ३ लाख ४७ हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. सकाळी या वादळाचा वेग प्रतितास १५१ किमी होता. या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून चीन सरकारने पावले उचलली आहेत.
भारत करणार मदत
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वर लिहिले की, नेपाळमधील जीवितहानी आणि नुकसानीमुळे आम्ही दुःखी आहोत. भारत नेपाळ सरकार आणि जनतेसोबत उभा आहे. गरज भासल्यास भारत सर्वतोपरी मदत करेल.
वाहतूक बंद : नेपाळमध्ये आपत्कालीन सेवा, मालवाहतूक आणि काही प्रवासी वाहनेच चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. खराब हवामानामुळे सर्व देशांतर्गत विमानसेवा तात्पुरत्या थांबविण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्रिभुवन विमानतळाचे महाव्यवस्थापक हंसा राज पांडे यांनी दिली.
नेपाळमध्ये पुराचे ५१ बळी, १० जण बेपत्ता
काठमांडू : नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली असून, आता ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १० जण बेपत्ता आहेत. पूर्व नेपाळच्या इलाम जिल्ह्यात भूस्खलनामुळे सर्वाधिक ३७ मृत्यू झाले आहेत.