हृदयद्रावक! शिकवता शिकवता श्वास थांबला, वर्गातच शिक्षकाने प्राण सोडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 15:21 IST2022-10-21T15:20:51+5:302022-10-21T15:21:36+5:30
Teacher: प्रयागराज शहरातील एका नामांकित कॉलेजमधील एका शिक्षकाचा वर्गात शिकवत असतानाच मृत्यू झाला. सदर शिक्षक डेंग्यूने पीडित होते. अल्फ्रेड सुमित कुमार कुजूर असं या शिक्षकाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना डेंग्यूचा संसर्ग झाला होता.

हृदयद्रावक! शिकवता शिकवता श्वास थांबला, वर्गातच शिक्षकाने प्राण सोडला
प्रयागराज - प्रयागराजमध्ये डेंग्यूचा कहर सुरूच आहे. शहरात डेंग्यूमुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी शहरातील एका नामांकित कॉलेजमधील एका शिक्षकाचा वर्गात शिकवत असतानाच मृत्यू झाला. सदर शिक्षक डेंग्यूने पीडित होते.
सदर घटना सिव्हिल लाईन परिसरातील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये घडली आहे. ३२ वर्षीय शिक्षक अल्फ्रेड सुमित कुमार कुजूर असं या शिक्षकाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना डेंग्यूचा संसर्ग झाला होता. ते विद्यार्थ्यांना कॉमर्स हा विषय शिकवायचे. गुरुवारी दुपारी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. तेवढ्यात त्यांची प्रकृती बिघडली. समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना काही कळण्यापूर्वीच ते खाली कोसळले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. डेंग्यूमुळे शिक्षकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरताच कॉलेजमध्ये खळबळ उडाली. व्यवस्थापनाकडूनही कॉलेजमधील शैक्षणिक कार्य दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे.
सेंट जोसेफ कॉलेजचे प्राचार्य फादर थॉमस कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्फ्रेड सुमित कुमार कुजूर हे तीन महिन्यांपूर्वीच कॉलेजमध्ये रुजू झाले होते. त्यांची आईसुद्धा या कॉलेजमध्ये शिकवायची. मात्र काही काळापूर्वी त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. सुमित कुमार यांना काही दिवसांपासून ताप येत होता. ते सुट्टीवर होते. मात्र विद्यार्थ्यांचा अभ्यास मागे पडत असल्याने ते थोडं बरं वाटल्याने शिकवण्यासाठी आले होते. सुमित कुमार कुजूर यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांची पत्नी एसएमसी कॉलेजमध्ये शिक्षिका आहे.