सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:05 IST2025-10-06T09:55:44+5:302025-10-06T10:05:31+5:30
लेहमधील हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, याबाबत आज सुनावणी होणार आहे.

सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
लेहमधील हिंसाचारानंतर सरकारने सोनम वांगचुक यांना अटक केली. सध्या ते जोधपूर तुरुंगात आहेत. त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी त्यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, यावर आज सुनावणी होणार आहे. आजच्या याचिकेत त्यांना दिलासा मिळणार की नाही हे कळणार आहे.
गेल्या महिन्यात २६ सप्टेंबर रोजी सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनम वांगचुक यांचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था, ISI शी संबंध असल्याचा दावाही करण्यात आला होता.
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
सोनम वांगचुक यांच्या पत्नीने २ ऑक्टोबर रोजी संविधानाच्या कलम ३२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि हेबियस कॉर्पसची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयात आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
लेह हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू
२४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये अचानक हिंसाचार उसळला. निदर्शकांनी भारतीय जनता पक्षाचे मुख्यालयही जाळून टाकले. सोनम वांगचुक यांनी हिंसाचार भडकवण्यात मोठी भूमिका बजावली, असे पोलिस तपासात दिसून आले. त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे निदर्शने हिंसक झाली. हिंसाचार शांत करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला, यामुळे चार जणांचा मृत्यू झाला.
सोनम वांगचुक यांना दोन दिवसांनी अटक
लेहमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आणि अनेक भागात इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आल्या होत्या. संपूर्ण घटनेत सोनम वांगचुक यांचा मोठा प्रभाव असल्याचा संशय होता. परिणामी, हिंसाचार सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्यावर दोन स्वयंसेवी संस्थांद्वारे परदेशी निधी दिल्याचा आरोपही होता.