health minister dr harsh vardhan on corona vaccine programme in india | "आज मी अत्यंत आनंदी व समाधानी, कोरोना विरोधातील लढ्यात ही लस ठरणार संजीवनी" 

"आज मी अत्यंत आनंदी व समाधानी, कोरोना विरोधातील लढ्यात ही लस ठरणार संजीवनी" 

नवी दिल्ली - जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा आजपासून शुभारंभ झाला आहे. देशातील कोविड योद्ध्यांचे सर्वप्रथम लसीकरण करण्यात येत आहे. त्यात आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. भारतात जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान सुरू होत आहे. कोरोना लसीकरणाचा शुभारंभ होतानी सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. ज्याला कोरोना लसीची सर्वांत जास्त गरज आहे, त्यालाच प्राधान्यक्रमाने कोरोना लस मिळणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशात सुरू असलेल्या मोहिमेवर प्रतिक्रिया दिली आहे. ही लस कोरोना महामारीच्या विरोधात संजीवनीसारखं काम करेल असं म्हटलं आहे. "मी आज अत्यंत आनंदी व समाधानी आहे. आपण गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात कोरोना विरोधात लढाई लढत आहोत. कोरोना विरोधातील लढ्यात ही लस "संजीवनी" म्हणून काम करेल. ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे" असं यांनी हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. तर कोरोनावरील लस केव्हा येणार, असा प्रश्न विचारणाऱ्या सर्वांनाच मी हे सांगू इच्छितो की, लस आता आपल्यापर्यंत पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे, दुसऱ्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्राचा मानस आहे, असं मोदी यांनी सांगितलं. 

डॉ. हर्षवर्धन यांनी "आपण या अगोदरही पोलिओ व कांजण्यासारख्या आजारांना नष्ट केलं आहे. भारताकडे अशाप्रकारच्या संकटांना सामोरं जाण्याचा बराच अनुभव आहे. हे कदाचित जगातील सर्वात मोठी लसीकरण अभियान आहे" असं म्हटलं आहे. आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. पहिला आणि दुसरा डोस यामध्ये एक महिन्याचे अंतर ठेवले जाणार आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्याने कोरोनाविरोधाची प्रतिकारशक्ती तयार होईल. त्यामुळे निष्काळजीपणा दाखवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. 

कोरोना लसीच्या गुणवत्तेबाबत वैज्ञानिक आणि तज्ज्ञ दोन्ही आश्वस्त झाल्यानंतरच याच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. कोरोना लसीबाबत केल्या जाणाऱ्या अप्रचाराला अजिबात बळी पडू नका. आपल्याला वाचवण्यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, सफाई कर्मचारी यांनी मानवतेबाबत असलेल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. ते कुटुंबापासून दूर राहिले. अनेक दिवस ते घरी  गेले नाहीत. काही कोरोना योद्धे माघारी घरी परतले नाहीत, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: health minister dr harsh vardhan on corona vaccine programme in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.