स्कूटीवरून यायचा अन् महिला, वृद्धांवर फटका मारून जायचा, असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 14:04 IST2024-12-30T14:04:24+5:302024-12-30T14:04:47+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये मागच्या काही दिवसांपासून एका माथेफिरूने उच्छाद घातला होता. हा माथेफिरू स्कूटीवरून येऊन वाटेतून चालणाऱ्या महिला, मुली, वृद्ध यांच्यावर फटका मारून जात असे. दरम्यान, नौचंदी पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेऊन त्याच्याकडील स्कूटी जप्त केली आहे.

स्कूटीवरून यायचा अन् महिला, वृद्धांवर फटका मारून जायचा, असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात
उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये मागच्या काही दिवसांपासून एका माथेफिरूने उच्छाद घातला होता. हा माथेफिरू स्कूटीवरून येऊन वाटेतून चालणाऱ्या महिला, मुली, वृद्ध यांच्यावर फटका मारून जात असे. दरम्यान, नौचंदी पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेऊन त्याच्याकडील स्कूटी जप्त केली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून पोलीस आरोपीच्या मागावर होते. अखेरीस ५० हून अधिक सीसीटीव्हीमधील चित्रिकरण तपासून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. तसेच त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी हा डिप्रेशनने ग्रस्त असून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मेरठमधील नौचंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फूलबाग कॉलनीमध्ये मागच्या काही दिवसांपासून स्कूटीवरून येणाऱ्या एका थप्पडबाज माथेफिरूने दहशत निर्मण केली होती. हा माथेफिरू स्कूटीवरून येऊन पादचाऱ्यांवर मागून फटका मारून निघून जायचा. त्याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता. त्यात तो एका निवृत्त अधिकाऱ्यावर फटका मारताना दिसत होता. तसेच हा फटका एवढा जोरात बसला होता की ते अधिकारी धडपडून खाली पडले होते.
परिसरातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी माथेफिरूने अनेक महिला आणि मुलींनाही आपली शिकार केलं होतं. त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या महिला त्रस्त होत्या. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारही दिली होती. तेव्हापासून पोलीस या आरोपीचा शोध घेत होते.
दरम्यान, रविवारी रात्री आरोपी माथेफिरूला पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीचं नाव कपिल असून तो मानसिक तणावाने ग्रस्त असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपीचे मानसिक संतुलन बिघडलेले असून, तो मनात येईल, ते करतो, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.