मालकासाठी आयुष्य झिजवलं, पण त्याने मुलाच्या लग्नाला बोलावलं नाही; ६० वर्षीय वृद्धाची पोलीस ठाण्यात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:40 IST2026-01-10T10:36:47+5:302026-01-10T10:40:18+5:30
एका ६० वर्षीय वृद्धाने आपल्या मालकाविरुद्ध चक्क पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याचं कारण ऐकून पोलीसही अवाक झाले.

AI Generated Image
समाज कितीही आधुनिक झाला असला तरी माणसाला आजही पैशांपेक्षा सन्मानाची भूक अधिक असते, याचा प्रत्यय देणारी एक आगळीवेगळी घटना ग्रेटर नोएडातील दनकौर पोलीस ठाण्यात घडली आहे. एका ६० वर्षीय वृद्धाने आपल्या मालकाविरुद्ध चक्क पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याचं कारण ऐकून पोलीसही अवाक झाले. चोरी किंवा मारहाण नाही, तर तब्बल ३० वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही मालकाने मुलाच्या लग्नाचं साधं निमंत्रण दिलं नाही, या अपमानामुळे दुखावलेला हा नोकर न्यायासाठी पोलिसांकडे पोहोचला.
नात्यातली ओढ की केवळ कामाचं नातं?
दनकौरच्या शोक बाजार परिसरातील एका भाजीच्या घाऊक दुकानात हा वृद्ध गेल्या तीन दशकांपासून काम करत आहे. ऊन असो वा पाऊस, सण असो वा उत्सव, या व्यक्तीने कधीही कामात कसूर केली नाही. मालकाचा व्यापार शून्यातून उभा राहताना त्यांनी स्वतःला झिजवून घेतलं. मालकाची मुलं डोळ्यासमोर मोठी झाली, शिकली, सवरली. या काळात मालकाच्या कुटुंबानेही नेहमी आपुलकी दाखवली, त्यामुळे हे नातं केवळ 'मालक-नोकर' असं न राहता एका कुटुंबासारखं झालं होतं, असं या वृद्धाचं मत होतं.
हृदय हेलावून टाकणारी तक्रार
काही दिवसांपूर्वी मालकाच्या मुलाचं लग्न ठरलं. आधी साखरपुडा झाला, तेव्हा या नोकराला बोलावलं नाही. "काही गडबड असेल म्हणून राहिलं असेल," असं म्हणत त्यांनी स्वतःची समजूत घातली. पण जेव्हा प्रत्यक्ष लग्न पार पडलं आणि तरीही या ३० वर्षांच्या सहकाऱ्याला कुणीही निमंत्रित केलं नाही, तेव्हा मात्र त्यांचा संयम सुटला. ज्या मुलाला लहानाचं मोठं होताना पाहिलं, त्याच्याच लग्नात आपल्याला स्थान नाही, ही भावना त्यांना सलली.
पोलीसही पडले पेचात!
हा वृद्ध जेव्हा तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला, तेव्हा पोलिसांनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. "मी कोणताही गुन्हा केलेला नाही, फक्त मला सन्मान हवा होता. मालकाने माझा घोर अपमान केला आहे," अशी भावनिक मागणी त्यांनी केली. पोलिसांनी या प्रकरणावर सहानुभूती व्यक्त केली, मात्र कायद्याच्या चौकटीत 'लग्नपत्रिका न देणे' हा कोणताही गुन्हा ठरत नसल्याने एफआयआर नोंदवता येणार नसल्याचं स्पष्ट केलं.
सामाजिक बदलाची होतेय चर्चा
पोलिसांनी या वृद्धाला शांत करून घरी पाठवलं असलं, तरी पोलीस ठाण्यात हीच चर्चा रंगली होती. आजच्या काळात माणूस केवळ कायद्यासाठीच नाही, तर भावना दुखावल्या गेल्यावरही पोलिसांकडे धाव घेत आहे. ३० वर्षांची निष्ठा एका लग्नपत्रिकेपुढे शून्य ठरली, ही घटना बदलत्या सामाजिक नातेसंबंधांवर भाष्य करणारी ठरली आहे.