गुजरातमधील भरूच येथून एक धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. येथे खाकी वर्दीचे स्वप्न बघत गेल्या अनेक वर्षांपासून मेहनत करणाऱ्या एका तरुणाचा पोलीस उपनिरीक्षक भरतीदरम्यान मृत्यू झाला. या तरुणाचे नाव रविराज सिंह जडेजा असे आहे. त्याने धावण्याची चाचणी वेळेच्या आतच पूर्ण केली, मात्र यानंतर, त्याची प्रकृती खालवाली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. तो गुजरातमधील कच्छ येथून भरती प्रक्रियेसाठी भरूचला आला होता.
रविराज पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि लोक रक्षक दला (LRD)च्या भरती प्रक्रियेसाठी येथे आला होता. त्याने सकाळी धावण्याची चाचणी दिली. या चाचणीत त्याला ५ किलोमीटर अंतर २५ मिनिटांत पूर्ण करायचे होते. मात्र हे अंतर त्याने केवळ २१ मिनिटांतच पूर्ण केले. मात्र शर्यत पूर्ण केल्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यावेळी, तेथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने तो बेशुद्ध पडला. यानंतर त्याला तातडीने भरूच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.
भरूचचे एसपी अक्षय राज मकवाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, "रविराजने या भरतीसाठी प्रचंड सराव केला होता. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, त्याच्या हृदयात ब्लॉकेज असल्याचे समोर आले आहे."
रविराजचे वडील महेंद्र सिंह जडेजा हे स्वतः स्टेट रिझर्व्ह पोलीसमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक आहेत. ते सध्या बडोदा येथे तैनात आहेत. रविराज वडिलांसोबतच राहत होता. तो परिक्षेसाठी भरूच यथे आला होता. येथील मैदानावरच त्याने यापूर्वीही शारीरिक चाचणी दिली होती, मात्र तेव्हा त्याला अपयश आल होते. या दुर्दैवी घटनेप्रकरणी भरूच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.