आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:39 IST2025-08-25T14:38:09+5:302025-08-25T14:39:00+5:30
५० वर्षीय सुंदरचं त्याच्या कुटुंबाशी भांडण झालं.

आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृंदावन परिसरात एका ५० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने यमुना नदीत उडी मारली. पण उडी मारताच त्याचा मूड बदलला आणि तो अचानक मदतीसाठी ओरडू लागला. त्याच्या किंकाळ्या ऐकून तेथून जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना कळवलं आणि तो कसा तरी वाचला.
वृंदावन पोलीस ठाण्याचे एसएचओ संजय पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी घडली जेव्हा ५० वर्षीय सुंदरचं त्याच्या कुटुंबाशी भांडण झालं. रागाच्या भरात त्याने जीव देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या घराजवळील नदीत उडी मारली.
उडी मारल्यानंतर सुंदरला समजलं की, हा विचार योग्य नाही. अशा परिस्थितीत, तो स्वतःला वाचवण्यासाठी वेगाने हातपाय हलवू लागला. एसएचओ म्हणाले की, तो एका पुलाच्या खांबाला चिकटून राहिला आणि मदतीसाठी याचना करू लागला. रस्त्याने जाणाऱ्या भुरा सिंगने त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकला आणि पोलिसांना कळवलं.
माहिती मिळताच पीआरव्ही (पोलिस रिस्पॉन्स व्हेईकल) ७५९७ तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्याला नदीतून बाहेर काढलं. पाण्याचा प्रवाह वेगवान होता आणि सुंदरची खांबावरची पकड कमकुवत होत होती. कॉन्स्टेबल विशाल तोमर आणि ड्रायव्हर नरेश कुमार यांनी दोरीच्या मदतीने नदीत उतरून त्याला वाचवलं. वाचवल्यानंतर सुंदरने पोलिसांचे आभार मानले.