स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 19:54 IST2026-01-11T19:53:41+5:302026-01-11T19:54:18+5:30
Karnataka Crime News: वडील लग्न लावून देत नसल्याने संतापलेल्या मुलानं वडिलांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. वडिलांनी स्वत: दोन लग्न केली. मात्र आपलं वय ३५ वर्षांच्या पुढे जाऊनही आपल्या लग्नाबाबत काहीच विचार करत नसल्याने संतापलेल्या या तरुणाने रागाच्या भरात भयंकर कृत्य करत स्वत:च्याच वडिलांची हत्या केली

स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
वयाची ३५, ४० वर्षे झाली तरी मुलांची न होणारी लग्नं ही आज एक गंभीर समस्या बनलेली आहे. त्यातच आई-वडील लग्नाचं वय उलटत असतानाही मुलांच्या लग्नाबाबत गांभीर्याने विचार करत नसतील तर मुलांना नैराश्य येणं साहजिकच आहे. अशा मुलांपैकी कुणी संतापून त्याचा राग पालकांवर काढला तर..., अशीच एक धक्कादायक घटना कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये घडली आहे.
येथे वडील लग्न लावून देत नसल्याने संतापलेल्या मुलानं वडिलांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. वडिलांनी स्वत: दोन लग्न केली. मात्र आपलं वय ३५ वर्षांच्या पुढे जाऊनही आपल्या लग्नाबाबत काहीच विचार करत नसल्याने संतापलेल्या या तरुणाने रागाच्या भरात भयंकर कृत्य करत स्वत:च्याच वडिलांची हत्या केली. ही घटना चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गा येथे बुधवारी रात्री घडली.
या प्रकरणातील आरोपीची ओळख एस. निंगराजा (३५) याच्या रूपात पटली असून, तो पेशाने शेतकरी आहे. तर हत्या झालेल्या वडिलांचं नाव टी. सन्ननिंगप्पा असे होते. आरोपी निंगराजा याने वडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
वडिलांनी आपलं लग्न लावून न दिल्याने निंगराजा हा त्याच्या वडिलांवर नाराज होता. गावातील त्याच्या वयाच्या तरुणांची लग्न झाली होती. तसेच काहींना मुलंबाळंही आहेत. त्यामुळे अविवाहित असलेला निंगराजा नाराज होता. वडिलांनी स्वत: दोन दोन लग्नं केली. मात्र आपल्या भवितव्याबाबत ते फारसा विचार करत नाहीत, याचा राग त्याच्या मनात होता. त्यामधून त्याने हे धक्कादायक कृत्य केले.