त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 08:25 IST2025-10-06T08:24:12+5:302025-10-06T08:25:35+5:30
काही दिवसांपूर्वी एका युवकाला काही अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात अडवून, त्याचा प्रायव्हेट पार्ट कापल्याच्या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली होती.

AI Generated Image
मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका युवकाला काही अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात अडवून, त्याचा प्रायव्हेट पार्ट कापल्याच्या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली होती. या संतापजनक घटनेमुळे गावकऱ्यांनी तीव्र निदर्शनं देखील केली होती आणि आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. मात्र, आता या थरारक घटनेमागचं गूढ उकललं असून, पोलिसांच्या तपासात जे सत्य समोर आलं आहे, त्यानं सगळ्यांनाच धक्का दिला आहे. हा हल्ला दुसऱ्या कुणी केला नसून, खुद्द त्या युवकानेच स्वतःवर वार केल्याचं निष्पन्न झालं आहे!
गुन्हा लपवण्यासाठी रचला बनाव
गाडरवारा येथील डोंगरगाव पोलीस स्टेशन परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. पीडित युवकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं होतं की, तो बाईकवरून जात असताना मास्क घातलेल्या ४ ते ५ लोकांनी त्याला रस्त्यात अडवलं, जबरदस्तीने झुडपांमध्ये ओढून नेलं आणि त्याचं गुप्तांग कापलं. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या या युवकाच्या जबाबावर विश्वास ठेवून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली, संशयितांचा शोध घेण्यात आला आणि ही घटना अत्यंत गंभीरतेने घेतली गेली.
मानसिक तणावात उचलले धक्कादायक पाऊल!
पोलिसांनी घटनेचा कसून तपास सुरू केल्यानंतर युवकाच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या. पोलिसांनी जेव्हा बारीकसारीक पुराव्यांची तपासणी केली, तेव्हा सत्य बाहेर आलं. या युवकाने ब्लेडने स्वतःच्या खासगी भागावर आणि मांडीवर वार केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण गेल्या काही दिवसांपासून शारीरिक आणि तीव्र मानसिक तणावाखाली होता. याच मानसिक दबावातून त्यानं इतकं भयानक पाऊल उचललं आणि नंतर कुटुंब तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पूर्णपणे खोटी कहाणी रचली होती.
युवकाची प्रकृती स्थिर
दरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, या प्रकरणात बाहेरच्या कोणत्याही हल्ल्याचा किंवा षडयंत्राचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. या अविश्वसनीय आणि धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी आपला तपास थांबवला आहे.