Hathras Case : प्रकाश आंबेडकरांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट; म्हणाले - सीबीआय तपासावर विश्वास नाही
By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 11, 2020 21:13 IST2020-10-11T21:06:10+5:302020-10-11T21:13:52+5:30
पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, संबंधित कुटुंब अस्वस्थ आहे. या कुटुंबाचे दुःख वाटून घेण्यासाठी आलो आहे. या कुटुंबाचा येथील पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. (Prakash Ambedkar)

Hathras Case : प्रकाश आंबेडकरांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट; म्हणाले - सीबीआय तपासावर विश्वास नाही
हाथरस - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी हाथरस येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी, हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणे आवश्यक आहे. सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, संबंधित कुटुंब अस्वस्थ आहे. या कुटुंबाचे दुःख वाटून घेण्यासाठी आलो आहे. या कुटुंबाचा येथील पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. न्यायालयीन तपासाचे आदेश आल्यास त्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड लावायला हवा. यामुळे पुरावे काढणे सोपे होईल.
सीबीआय तपासावर प्रश्न -
सीबीआय तपासासंदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले, येथील अधिकारीच सीबीआयमध्ये जातात. स्थानिक अधिकाऱ्यांशीही त्यांचे संबंध असतात. अशात सीबीआयवर विश्वास नाही. जर सीबीआय अथवा एसआयटीने तपास केला, तर सर्व दस्तऐवज न्यायालयाच्या देखरेखीत असायला हवेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली होऊ नये. रात्रीतूनच मृतदेह जाळला, तर कुणावर विश्वास ठेवावा? येथील प्रशासनाने धमकावण्याचे काम केले आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
एक ट्विट करत प्रकाश आंबेडकर म्हणाले, ''आज हाथरसच्या आमच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आलो होतो. योगी सरकारने आज सकाळी यांना लखनौ येथे नेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कुणीही नेण्यासाठी आलेले नाही. सरकारने अधिक संवेदनशील होणे आवश्यक आहे. आम्ही आणि देशातील कोट्यवधी आंबेडकरवादी आपल्या या कुटुंबासोबत आहोत. हाच विश्वास देऊन जात आहे.''
''हे स्पष्ट आहे, की स्थानिक शासन-प्रशासनाने आपली विश्वसनीयता पूर्णपणे गमावली आहे. यामुळेच कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त अथवा सिटिंग न्यायाधिशांकडून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे. जी अगदी उचित आहे. कुटुंबाच्यावतीने आपल्या सर्व पक्षांना ही मागणी करावी लागेल,'' असेही आंबेडकरांनी म्हटले आहे.