भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 15:17 IST2025-11-22T15:17:23+5:302025-11-22T15:17:56+5:30
एका चालत्या गाडीला अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच कार जळून खाक झाली.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सीमेवर असलेल्या हथिनीकुंड बॅरेजजवळ शनिवारी एक मोठी दुर्घटना टळली. एका चालत्या गाडीला अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच कार जळून खाक झाली. यमुना नदीवरील पुलावर घडलेल्या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कारमधील सर्वजण वेळेवर सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कारमधून हलका धूर निघताना दिसला. काही सेकंदात खूप धूर यायला लागला आणि अचानक कारच्या बोनेटमधून आगीच्या ज्वाळा निघाल्या. आग पसरताच आत असलेले लोक घाबरले, परंतु त्यांनी बाहेर उडी मारली आणि आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. आगीने संपूर्ण कारला वेढलं.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला, ज्यामध्ये कार जळत असल्याचं आणि काही अंतरावर उभे असलेले लोक याचा व्हिडीओ आणि फोटो काढत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. भीषण आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळानंतर आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत कार पूर्णपणे आगीत जळून खाक झाली होती. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या तपासात आगीचं कारण कारमधील तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किट असल्याचं दिसून आलं आहे, परंतु फॉरेन्सिक रिपोर्टनंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल. पोलीस कार मालकाकडून याबाबत माहिती घेत आहेत. या घटनेनंतर प्रशासनाने लोकांना इशारा दिला की जर त्यांना त्यांच्या वाहनातून आवाज, धूर किंवा जळण्याचा वास येत असेल तर त्यांनी ताबडतोब कार थांबवावी आणि बाहेर पडावं.