haryana bjp mla ram kumar kashyap ran amid questions on agricultural bills video viral | VIDEO: कृषी विधेयकांबद्दल शेतकऱ्यांनी प्रश्न विचारताच भाजपा आमदारानं काढला पळ

VIDEO: कृषी विधेयकांबद्दल शेतकऱ्यांनी प्रश्न विचारताच भाजपा आमदारानं काढला पळ

चंदीगढ: नुकतंच पार पडलेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन कृषी विधेयकांमुळे गाजलं. राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. माईकची मोडतोड करून उपसभापतींसमोरील नियम पुस्तिकाही फाडली. यानंतर आवाजी मतदानानं राज्यसभेत विधेयकं मंजूर झाली. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना विधेयकांवर स्वाक्षरी न करण्याची विनंती केली होती. मात्र कालच कोविंद यांनी तिन्ही विधेयकांना मंजुरी दिली. सरकारनं मंजूर केलेल्या विधेयकांविरोधात देशभरात लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. 

शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका भाजपच्या हरयाणातल्या एका आमदाराला बसला. या आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंद्री मतदारसंघाचे आमदार राम कुमार कश्यप यांना शेतकऱ्यांनी घेरलं. त्यांना कृषी विधेयकांबद्दल प्रश्न विचारले. मात्र कश्यप यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गराड्यातून कश्यप यांनी पळ काढला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @ramanmann1974 ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आमदार राम कुमार कश्यप शेतकऱ्यांसोबत बोलताना दिसत आहेत. 'शेतकरी आमची मतपेढी आहे. आमची मतं गमावू असं कोणतंही विधेयक आम्ही आणू का?,' असा प्रश्न कश्यप यांनी शेतकऱ्यांना विचारला. यानंतर उपस्थितांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ते पाहून आमदारांनी तिथून पळ काढला.

मोदी सरकारनं मंजूर करून घेतलेल्या कृषी विधेयकांविरोधात देशभरात निदर्शनं सुरू आहेत. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त करत आहेत. पंजाब, हरयाणामध्ये आंदोलनाचा जोर अधिक आहे. आज सकाळी राजपथावर आंदोलनादरम्यान एका ट्रॅक्टरला आग लावण्यात आली. कर्नाटकमधल्या शेतकरी संघटनांनी आज बंद पाळला आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी ठिय्या मांडला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: haryana bjp mla ram kumar kashyap ran amid questions on agricultural bills video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.