सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 18:02 IST2024-10-09T18:01:43+5:302024-10-09T18:02:33+5:30
Haryana Assembly Election Results: हरयाणा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर इंडिया आघाडीतील पक्ष काँग्रेसवर अतिआत्मविश्वास आणि अहंकार असल्याची टीका करत आहेत.

सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
Haryana Election Results 2024 : काल, म्हणजेच 8 ऑक्टोबर 2024 रोजी जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीने काँग्रेस सत्तेत आली, तर हरयाणात पक्षाला तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. एक्झिट पोलच्या अंदाज्यानंतर विजयाची आशा लावून बसलेल्या काँग्रेससाठी आलेला निकाल धक्कादायक आहे. विशेष म्हणजे, या निकालानंतर आता इंडिया आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी), अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने काँग्रेसवर बोचरी टीका करायला सुरुवात केली आहे. या पक्षांनी अतिआत्मविश्वास, अहंकार आणि हुकूमशाही वृत्ती, ही काँग्रेसच्या पराभवाची प्रमुख कारणे असल्याचे म्हटले आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षानेही आता काँग्रेसला मोठा धक्का देत पोटनिवडणुकीचे उमेदवार जाहीर केले आहेत.
कोण काय म्हणाले पाहा...
उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने 10 पैकी 6 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यातील 2 जागांवर काँग्रेसला उमेदवार उभे करायचे होते. ज्या दोन जागांवर भाजपने विजय मिळवला होता, त्या दोन जागा काँग्रेसला हव्या होत्या, पण काँग्रेसची ही मागणी धुडकावून लावत सपाने फुलपूर आणि माझवान जागेवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
तर, शिवसेना(उबाठा) मुखपत्र सामनाच्या संपादकीयमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी हरियाणातील काँग्रेसच्या पराभवापासून धडा घेण्याचा इशारा दिला आहे. त्यात म्हटले की, "राज्य नेतृत्वाचा अतिआत्मविश्वास आणि अहंकारामुळे हरयाणात पराभव झाला. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही असेच घडले. पक्षातील अंतर्गत वादामुळे दोन्ही राज्यात पक्षाचा पराभव झाला. काँग्रेसने हरयाणात आम आदमी पार्टी आणि इतर मित्रपक्षांना दूर ठेवले आणि एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. जम्मू आणि काश्मीरमध्ये ते जिंकले कारण त्यांनी एनसीशी युती केली," असे सामनात म्हटले आहे.
तर, हरयाणात काँग्रेसच्या निराशाजनक पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त करताना तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले म्हणाले, "अभिमान, अधिकार आणि प्रादेशिक पक्षांना तुच्छतेने पाहणे हे विनाशाचे कारण आहे." याशिवाय, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले असून विधानसभा निवडणुकीच्या निकालातून मिळालेला सर्वात मोठा धडा म्हणजे कधीही अतिआत्मविश्वास ठेवू नये, असे म्हटले.
हरियाणा निवडणुकीचे निकाल
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या निकालांनुसार, भाजपने 48 जागा जिंकून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तर काँग्रेसला 37 जागा जिंकण्यात यश आले. याशिवाय, इंडियन नॅशनल लोक दल (INLD) ने दोन आणि अपक्ष उमेदवारांनी तीन जागा जिंकल्या. विशेष म्हणजे, निकालानंतर तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता भाजपकडे 51 उमेदवारांचा पाठिंबा आहे.