मुलांना सोडून गुरुजींचा पोबारा
By admin | Updated: January 8, 2015 01:06 IST
- पाचगाव आश्रमशाळेतील प्रकार : शिक्षकांना मारहाणीची भीती
मुलांना सोडून गुरुजींचा पोबारा
- पाचगाव आश्रमशाळेतील प्रकार : शिक्षकांना मारहाणीची भीतीकोल्हापूर : एका विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी मंगळवारी थेट शाळेवरच हल्ला करीत शिक्षकांना मारहाण केल्याने भीतीपोटी निवासी शिक्षकांनी रात्रीच विद्यार्थ्यांना संस्थेच सोडून पोबारा केला. त्यामुळे बुधवारी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकांची वाट पाहत बसावे लागले.सातारा येथील भारतीय भटके, विमुक्त, विकास व संशोधन संस्थेची पाचगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू माध्यमिक आश्रमशाळा आहे. ३० डिसेंबरला शाळेतील वायर चोरल्याच्या आरोपावरून सूरज पवार याला अधीक्षक जाधव यांनी मारहाण केल्याच्या रागापोटी सूरजने मामाच्या उचगाव येथील घरी स्वत:वर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात सूरज गंभीर जखमी झाला. त्यामुळे चिडलेल्या नातेवाइकांनी मंगळवारी थेट शाळेवरच हल्ला चढवीत दिसेल त्या शिक्षकांना मारहाण केली.याची माहिती शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रूपेश पाटील यांना समजताच त्यांनी आश्रमशाळेत धाव घेत रात्री शंभर मुलांना आपल्या घरी नेले आणि बुधवारी सकाळी या मुलांना शाळेत आणून सोडले. मुले शाळेत आल्यानंतर सकाळी नऊ वाजता सुरू होणारी शाळा शिक्षकच नसल्याने दुपारी बारा वाजले तरी सुरू झाली नाही. त्यामुळे पुन्हा पाटील यांनी सातारा येथून अतिरिक्त कर्मचार्यांना बोलावून घेतले.-----यंदा आमचे दहावीचे वर्ष आहे. जे शाळेत शिकविले जाते, त्याच्याच आधारावर आम्ही शिकत आहोत. त्यामुळे शाळा लवकरात लवकर सुुरू व्हावी.- तृप्ती हेगडे, विद्यार्र्थिनी---------तू पारधी समाजाचा आहेस. तुझ्याकडून हे शिकणे होणार नाही. तू असाच आहेस, असे वारंवार जाणीवपूर्वक येथील शिक्षक सूरजला बोलत होते. यातच त्याच्यावर वायर चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यामुळे सूरजने घरी आल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. याला तेथील अधीक्षक व शिक्षक जबाबदार आहेत.- मारुती चव्हाण, सूरज पवारचे मामा ----------संस्थेतील विद्यार्थी सूरज पवार हा रीतसर रजाचिठ्ठी देऊन घरी गेला होता. त्याला अधीक्षक व कोणत्याही शिक्षकाने मारहाण केलेली नाही. त्यामुळे नातेवाइकांचे आरोप निखलास खोटे आहेत.- तानाजी घोरपडे, प्रभारी मुख्याध्यापक राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळा