‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह ईडीच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 04:53 IST2025-05-17T04:52:40+5:302025-05-17T04:53:43+5:30
गुजरातमधील प्रमुख दैनिकांपैकी एक ‘गुजरात समाचार’च्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले.

‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह ईडीच्या ताब्यात
अहमदाबाद: गुजरातमधील प्रमुख दैनिकांपैकी एक ‘गुजरात समाचार’च्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. छापेमारीनंतर या दैनिकाचे मालक बाहुबली शाह यांना ईडीने ताब्यात घेतले. मात्र आरोग्याच्या कारणास्तव न्यायालयात त्यांना ३१ मे पर्यंत जामीन मिळाला. मनी लाँड्रिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असा दावा करण्यात आला होता. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
बाहुबली शाह हे लोक प्रकाशन लिमिटेडच्या संचालकांपैकी एक असून, त्यांच्याकडे गुजरात समाचार या दैनिकाचा मालकी हक्क आहे. त्यांचे मोठे बंधू भाई श्रेयांश शाह या दैनिकाचे व्यवस्थापकीय संपादक आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी बाहुबली शाह यांना ताब्यात घेतले होते. अधिकाऱ्यांनी ३६ तास जीएसटीव्ही कार्यालयाची झाडाझडती घेतली. त्यानंतर ईडीच्या पथकाने या परिसरात छापा टाकला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी बाहुबली शाह यांना सुरुवातीला व्हीएस रुग्णालयात नेले व त्यानंतर शहरातील झायडस रुग्णालयात दाखल केले. शाह हृदयविकाराचे रुग्ण आहेत. त्यामुळे अचानक झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचा दावा डॉक्टरांच्या हवाल्याने करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)