गुजरात पूल दुर्घटनेप्रकरणी सरकारची मोठी कारवाई, अनेक अधिकारी निलंबित; १८ मृतदेह सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 22:30 IST2025-07-10T22:26:37+5:302025-07-10T22:30:48+5:30
गुजरात पूल कोसळल्याप्रकरणी सरकारने मोठी कारवाई केली आहे.

गुजरात पूल दुर्घटनेप्रकरणी सरकारची मोठी कारवाई, अनेक अधिकारी निलंबित; १८ मृतदेह सापडले
Gujarat Bridge Collapse: गुजरातमधील वडोदरा येथे बुधवारी झालेल्या भीषण पूल दुर्घटनेत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. सुमारे ४० वर्षे जुना असलेला हा पूल जीर्ण झाला होता. पण त्यावरून जड वाहनांची वाहतूक सुरूच होती. मात्र बुधवारी सकाळी हा पूल कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली. पूल कोसळला तेव्हा दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा अशी पाच वाहने नदीत पडली. तुटलेल्या पुलाच्या टोकाला एक टँकर अडकला होता. पूल कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्याच्या रस्ते आणि इमारत विभागाच्या चार अभियंत्यांना निलंबित केले आहे.
गुजरातमधील वडोदरा आणि आणंदला जोडणारा पूल कोसळल्यानंतर महिसागर नदीतून १८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एनडीआरएफला गुरुवारी सकाळी २ मृतदेह, दुपारी एक आणि संध्याकाळी एक मृतदेह सापडला, तर बुधवारी १३ मृतदेह सापडले होते. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण अजूनही बेपत्ता आहेत.
गुजरातमधील वडोदरा येथे झालेल्या पूल दुर्घटनेनंतर राज्य सरकारने या प्रकरणी कारवाई केली आणि अपघातासाठी जबाबदार असलेल्या गुजरात रस्ते आणि इमारत विभागाच्या चार अभियंत्यांना तात्काळ निलंबित केले. प्राथमिक चौकशीच्या आधारे राज्य सरकारने ही कारवाई केली. या दरम्यान, सरकारने एनएम नाईकवाला (कार्यकारी अभियंता), यूसी पटेल (उप-कार्यकारी अभियंता), आरटी पटेल (उप-कार्यकारी अभियंता) आणि जेव्ही शाह (सहाय्यक अभियंता) यांना निलंबित केले.
या अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी वडोदरा आणि आणंदला जोडणाऱ्या या पुलावरील अपघाताची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्त मुजपूर-गंभीरा पुलाची आतापर्यंत केलेली दुरुस्ती, तपासणी आणि गुणवत्ता तपासणी यासारख्या मुद्द्यांवर तज्ज्ञांच्या पथकाला अहवाल तयार करण्याची जबाबदारीही दिली होती. त्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने अपघातस्थळाला भेट दिली आणि अपघाताच्या कारणांचा प्राथमिक तपास अहवाल सरकारला सादर केला. याआधारे, राज्य सरकारने या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले.