Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 17:14 IST2025-10-16T17:13:33+5:302025-10-16T17:14:24+5:30
Gujarat Cabinet Expansion: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी गुरूवारी आपला राजीनामा दिला. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे.

Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
गुजरातच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही मोठे बदल मंत्रिमंडळात केले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले होते. त्यानुषंगाने मोठी घडामोड गुरूवारी घडली. गुजरात सरकारमधील १६ मंत्र्यांनी आपले राजीनामे दिले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात हे राजीनामे घेण्यात आले आहेत.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गुजरात सरकारमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत १६ मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाची माहिती मंत्र्यांना दिली. त्यानंतर मंत्र्यांनी आपले राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे सोपवले.
मंत्र्यांचे राजीनामे राज्यपालांकडे पाठवणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे गुरूवारी (१६ ऑक्टोबर) रात्री राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत मुख्यमंत्री मंत्र्यांचे राजीनामे सुपूर्द करणार आहेत. त्याचबरोबर या भेटीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलही चर्चा होणार आहे.
उद्याच मंत्रिमंडळ विस्तार, नवीन मंत्री घेणार शपथ
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) गुजरात सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. सकाळी ११.३० वाजता गांधीनगरमधील महात्मा मंदिरात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली जाणार असून, या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाही उपस्थित राहणार आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार करताना मंत्र्यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. सध्या मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात १६ मंत्री होते. सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. मंत्रिमंडळ विस्तार करताना ही संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नवी मंत्रिमंडळ २५ ते २६ मंत्र्यांचे असणार आहे.