श्रीमंतीचा माज अन् कायद्याचा अपमान; मुलाच्या वाढदिवशी रस्ता रोखून फटाके फोडणाऱ्या उद्योजकाला पोलिसांनी शिकवला धडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:50 IST2025-12-24T18:41:40+5:302025-12-24T18:50:20+5:30
मुलाच्या वाढदिवसासाठी रस्ता अडवून फटाके फोडणाऱ्या उद्योजकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

श्रीमंतीचा माज अन् कायद्याचा अपमान; मुलाच्या वाढदिवशी रस्ता रोखून फटाके फोडणाऱ्या उद्योजकाला पोलिसांनी शिकवला धडा
Fireworks to FIR: श्रीमंतीचा माज आणि कायद्याचा धाक नसणे याचे जिवंत उदाहरण गुजरातच्या सुरत शहरात पाहायला मिळाले आहे. आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सार्वजनिक रस्ता अडवून, ट्रॅफिक जॅम करून फटाके फोडणाऱ्या दीपक इजारदार या रिअल इस्टेट उद्योजकाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक झाल्यानंतरही या उद्योजकाने मी सेलिब्रिटी आहे असं स्पष्टीकरण दिल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
सुरतच्या ड्युमस रोडवर ही घटना घडली. उद्योजक दीपक इजारदार याने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एका कथेचे आयोजन केले होते. कथा संपल्यानंतर त्याने आपल्या सुरक्षा रक्षकासह थेट मुख्य रस्ता अडवला आणि फटाके फोडण्यास सुरुवात केली. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
वाहनचालकांना धमकावले
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, मागे उभे असलेल्या एका कार चालकाने रस्ता रिकामा करण्यासाठी हॉर्न वाजवला, तेव्हा दीपक इजारदार संतापला. त्याने हातातील जळत्या फटाक्यांचे तोंड थेट त्या कारच्या दिशेने केले आणि चालकाला शांत बसण्याचा इशारा देत धमकावले. इतकेच नाही, तर गाडी पेटवून देईन अशी धमकीही त्याने दिल्याचे समोर आले आहे.
"I am a celebrity": Surat businessman blocks road to celebrate son’s birthday with fireworks. pic.twitter.com/TG9iSjyDrI
— The Tatva (@thetatvaindia) December 24, 2025
"मी सेलिब्रिटी आहे"; उद्योजकाचा अजब युक्तिवाद
या कृत्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करण्याऐवजी इजारदारने मीडियासमोर आपली मुजोरी सुरूच ठेवली. तो म्हणाला, "मी एक सेलिब्रिटी आहे, पाच मिनिटे ट्रॅफिक रोखून फटाके फोडले तर कोणता मोठा गुन्हा केला? आम्हा सेलिब्रिटींवर मोठा अन्याय केला जात आहे." त्याने आपल्या कृत्याचे समर्थन करताना म्हटले की, जर कार चालकाला जावू दिले असते आणि पेट्रोलने पेट घेतला असता तर लोकांचा जीव गेला असता, म्हणून मी त्यांना थांबवले होते.
पोलिसांचा दणका आणि अटक
हे प्रकरण गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांच्या मतदारसंघामधील असल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. सार्वजनिक शांततेचा भंग करणे, रस्ता अडवणे आणि लोकांना धमकावल्याप्रकरणी ड्युमस पोलिसांनी ५८ वर्षीय दीपक इजारदार याला अटक केली आहे.