एक विवाह ऐसा भी! नवरदेवाने हुंड्याचे ७ लाख केले परत; म्हणाला, "आम्हाला फक्त १ रुपया अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:25 IST2025-11-18T16:25:12+5:302025-11-18T16:25:43+5:30
अमित आणि त्याच्या वडिलांनी हुंडा म्हणून मिळालेले ७ लाख रुपये परत करून एक आदर्श घालून दिला आहे.

फोटो - nbt
मध्य प्रदेशातील हरदा येथील अमित आणि त्याच्या वडिलांनी हुंडा म्हणून मिळालेले ७ लाख रुपये परत करून एक आदर्श घालून दिला आहे. त्यांनी फक्त एक रुपया आणि नारळ स्वीकारला. त्यांच्या या उपक्रमाचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केलं जात आहे. लग्नापूर्वी वधूच्या कुटुंबाने ७ लाख रुपये हुंडा पाठवला होता. नवरदेवाच्या वडिलांनी हुंडा स्वीकारण्यास नकार दिला आणि हे चुकीचं असल्याचं सांगितलं.
नवरदेव अमित म्हणाला की, त्याचं लग्न २२ नोव्हेंबर रोजी भुवन खेडी येथील जयश्रीशी लग्न होणार आहे. अमितने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. रविवारी एका समारंभात, वधूच्या कुटुंबाने हुंडा म्हणून ७ लाख रुपये पाठवले. त्यानंतर अमितने त्याच्या वडिलांशी या विषयावर चर्चा केली. त्यांनी एकत्रितपणे ७ लाख रुपये नाकारण्याचा निर्णय घेतला. फक्त एक रुपया स्वीकारला.
नवरदेवाच्या कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाचं संपूर्ण जिल्ह्यात भरभरून कौतुक झालं आहे. हुंड्यामुळे होणाऱ्या हत्या आणि सुनेचा छळ करण्याच्या घटना देशभरात घडत असताना हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अमित म्हणाला की, कन्यादानापेक्षा मोठं दान नाही. त्यांनी हुंडा या प्रथेचं समाजातून उच्चाटन करणं आवश्यक आहे. त्यामुळे हुंडा घेणं आणि देणं दोन्हीही चुकीचं आहे.
वधूच्या कुटुंबाने वारंवार पैसे घेण्याची विनंती केली, परंतु नवरदेव आणि त्याचे वडील आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी वधूच्या कुटुंबाच्या सन्मानार्थ फक्त एक नारळ आणि एक रुपया स्वीकारून पूजा आणि अन्य विधी पार पाडले. जेव्हा तुम्ही तुमची मुलगी देता तेव्हा याचा अर्थ तुम्ही तुमचं सर्वस्व आम्हाला दिलं आहे असं अमितच्या वडिलांनी म्हटलं.