लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 14:23 IST2025-05-24T14:23:26+5:302025-05-24T14:23:51+5:30
Bihar Crime News: लग्नादरम्यान झालेल्या किरकोळ वादामुळे भर मंडपातून नवरदेवाचंच अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात घडली आहे. काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी
लग्नादरम्यान झालेल्या किरकोळ वादामुळे भर मंडपातून नवरदेवाचंच अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात घडली आहे. काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या दरम्यान वधु-वरासह नातेवाईकांनाही बेदम मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, वराच्या अपहरणाचा आरोप वरातीमध्ये मनोरंजनासाठी बोलावण्यात आलेल्या लौंडा नाच पार्टीच्या सदस्यांवर करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैकुंठपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघवा दुबौली येथून नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साधू चौक येथील सुरेंद्र शर्मा यांच्या मुलीची वरात आळी होती. लग्नसोहळ्यात मनोरंजनासाठी वर पक्षाने लौंडा नाच पार्टी बोलावली होती. यादरम्यान, नाचगाण्यावरून कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. तसेच काही वेळातच या वादाचं पर्यावसान हाणामारीमध्ये झालं. वाद वाढल्यावर लौंडा नाच पार्टीमधील डझनभर लोकांनी वधूच्या दरवाजापर्यंत धाव घेतली, तसेच तिथे असलेल्या नातेवाईकांना मारहाण केली.
या वादात वधूसह तिची आई आणि इतर महिलाही जखमी झाल्या. हल्लेखोरांनी घरात घुसून दागदागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंची लूटही केली. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली की त्यांनी मंडपामध्ये बसलेल्या वरालाही सोडलं नाही. तसेच त्याला मारहाण करून गाडीत बसवले आणि त्याचे अपहरण केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी घनास्थळावरून फरार झाले होते. वर अद्याप बेपत्ता असून, त्यामुळे लग्नघरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.