Noida Viral Video: श्वानप्रेमींच्या अरेरावीमुळे काहीवेळा सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या एका इमारतीमध्ये घडला आहे. ग्रेटर नोएडा पश्चिम येथील गौर सिटी दोनच्या सोसायटीत ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने श्वानाला लिफ्टमध्ये चढू देण्यास नकार दिल्याने एका निष्पाप आठ वर्षाच्या मुलाला लिफ्टमधून बाहेर काढत बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र महिलेच्या कृत्याविरोधात संपूर्ण सोसायटीमध्ये संतापाची लाट उसळली होती.
श्वानप्रेमी महिलेने एका आठ वर्षाच्या मुलाला लिफ्टमधून बाहेर काढत मारहाण केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. श्वानाला लिफ्टमध्ये आणू नका एवढंच सांगितल्याने महिलेला राग अनावर झाला आणि तिने मुलाला लिफ्टमधून खेचून बाहेर काढलं. गौर सिटी दोनच्या एका इमारतीमधल्या लिफ्टमध्ये हा प्रकार घडला असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सोसायटीत राहणारा मुलगा ट्यूशनवरून घरी जात होता. त्यावेळी एक महिला आपल्या पाळीव श्वानासह लिफ्टमध्ये घुसली. त्यामुळे मुलगा घाबरला आणि त्याने हात जोडून त्या महिलेला श्वानाला लिफ्टमध्ये न नेण्याची विनंती करू लागला.
महिलेला मुलाच्या बोलण्याचा राग आला आणि तिने त्याला जबरदस्तीने लिफ्टमधून बाहेर काढले. त्यानंतर महिलेने मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे. या महिलेचा यापूर्वीही श्वानावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सोसायटीमधील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. रात्री उशिरा संतप्त लोकांनी सोसायटीच्या गेटवर घोषणाबाजीही केली. या प्रकरणाची माहिती मिळताच बिसरख पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना शांत केले.
रात्री झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. "सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत," अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, भविष्यात अशा घटनांना होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद होऊ नये म्हणून महिलेने मुलाला लिफ्टबाहेर खेचून काढल्याचा आरोप रहिवाशांनी केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर आरोपी महिलेवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.