दारू सोडा आणि ८० लाख मिळवा! शिक्षण मंत्र्यांची गावकऱ्यांना बंपर ऑफर; चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 21:06 IST2026-03-16T21:05:08+5:302026-03-16T21:06:46+5:30
एकीकडे व्यसनाधीनतेमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत असताना, राजस्थानमधील एका मंत्र्याने गावाला व्यसनमुक्त करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.

दारू सोडा आणि ८० लाख मिळवा! शिक्षण मंत्र्यांची गावकऱ्यांना बंपर ऑफर; चर्चेला उधाण
एकीकडे व्यसनाधीनतेमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत असताना, राजस्थानमधील एका मंत्र्याने गावाला व्यसनमुक्त करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. "तुम्ही फक्त दारू सोडा, मी तुम्हाला गावाच्या विकासासाठी ८० लाख रुपये देईन," अशी जाहीर ऑफर राज्याचे शिक्षण आणि पंचायती राज मंत्री मदन दिलावर यांनी दिली. मंत्र्यांने दिलेल्या अजब ऑफरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
मंत्री मदन दिलावर हे सध्या कोटा जिल्ह्यात जन हिताय-जन सुखाय पदयात्रेवर आहेत. या पदयात्रेच्या शेवटच्या दिवशी ते भैरूपुरा गावात पोहोचले. त्यावेळी गावकऱ्यांनी मंत्र्यांकडे रस्ते, नाली आणि इतर विकासकामांची मागणी केली. यावर बोलताना मंत्र्यांनी एक अट घातली. मदन दिलावर म्हणाले की, "मी तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करेन, पण त्या बदल्यात तुम्हाला दारू सोडावी लागेल. आजपासून तुम्ही दारू पिणार नाही, अशी शपथ घेतली तरच मी हा निधी मंजूर करेन." सुरुवातीला मंत्र्यांची ही अट ऐकून गावकरी काहीसे गोंधळले आणि शांत झाले. मात्र, मंत्र्यांनी आग्रहाने विचारल्यानंतर गावातील ज्येष्ठांनी पुढाकार घेतला. अखेर गावकऱ्यांनी पाण्याचा ग्लास हातात घेऊन आजपासून कधीही दारू पिणार नाही, अशी शपथ घेतली. गावकऱ्यांनी शब्द दिल्यानंतर मंत्री दिलावर यांनी तातडीने ८० लाख रुपयांच्या विकासकामांची घोषणा केली.
केवळ घोषणा करून मंत्री थांबले नाहीत, तर त्यांनी गावकऱ्यांना कडक इशाराही दिला. ते म्हणाले की, "जर कोणी पुन्हा दारू पिताना आढळले, तर मी दिलेला सर्व विकासनिधी थांबवून टाकेन आणि गावातील कामे बंद पाडल्या जातील." तसेच, गावकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेत त्यांनी आश्वासन दिले की, "तुम्ही माझे भाऊ आहात. जर कोणी आजारी पडले तर मला सांगा, मी जयपूरला नेऊन स्वतः तुमच्यावर उपचार करेन, पण व्यसनापासून दूर राहा."
शिक्षणासोबतच सामाजिक परिवर्तनासाठी मंत्र्यांनी उचललेले हे पाऊल सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. आता भैरूपुरा गाव आपल्या शब्दाला जागून ८० लाखांचा विकास पदरात पाडून घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.